पुणे जिल्हा : शिवछत्रपतींच्या पादुका शिवनेरीवर स्वस्थानी

पंढरीच्या भक्तीच्या महासागरात डुंबून शिवाजी महाराज जन्मभूमीत परतले
लेण्याद्री : संत माऊली श्रीज्ञानेश्वर महाराजांनी प्रारंभ केलेल्या भागवत परंपरेच्या दृष्टीने आत्यंतिक महत्त्वाच्या समजल्या जाणार्या पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी शिवनेरीवरून गेलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पादुकांचे स्वस्थानी शिवनेरीवर आगमन झाले. श्रीशिवजन्मभूमी स्थानी पादुकांच्या साक्षीने शिववंदना अभिवादन झाल्यानंतर, मुख्य पुजारी सोपान दुराफे यांनी श्री शिवाई देवीच्या चरणांशी श्रींच्या पादुकांना स्थापित केले. याप्रसंगी उपस्थित बालगोपालांच्या हस्ते शिवाई देवी व शिवाजी महाराजांच्या आरतीने या वर्षीच्या सोहळ्याची सांगता झाली.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकाच्या 350 व्या वर्धापन वर्षात, ज्येष्ठ शुद्ध एकादशीस शिवनेरीहून निघालेल्या शिवरायांच्या या पादुका राजाभिषेक उत्सवासाठी राजधानी रायगडास गेल्या होत्या. तेथून आपल्या निर्धारित मार्गाने पायीच प्रवास करत आषाढी एकादशीस शिवबा-विठोबा भेटीचा सोहळा पार पडल्यानंतर हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत हौतात्म्य पावलेल्या आपल्या सहकार्यांना दर्शन भेट द्यायला गेल्या होत्या.
पावनखिंड, नेसरी, कापशी, कुरुंदवाड, वडगाव, तळबीड, उमरठमध्ये आपल्या पराक्रमी मावळ्यांशी हितगुज केल्यानंतर जुन्नरखालील बारा मावळांचा प्रवास करुन शिवजन्मभूमीत परतल्या. शिवछत्रपतींच्या पादुकांच्या पालखी सोहळ्याचे हे यंदाचे 10 वे वर्ष तर परंपरेचे 30 वे वर्षे आहे.
शिवनेरीवरील शिवाई देवीच्या चरणांशी श्री शिवछत्रपतींच्या पादुका पुन:स्थापित करण्याची सेवेची संधी यावर्षी बारा मावळातील पौड खोर्याला प्राप्त झाली होती. रितेश जाधव, देवाशीष बंदोपाध्याय, रोहन जाधव, विशाल किरवे, राज पायगुडे, अक्षय इप्ते यांच्या नेतृत्वात आलेल्या पौडमधील महिला व बालगोपालांच्या गटाने यावर्षीच्या वारीचा समारोप करताना विशेष मेहनत घेतली.





