पुणे जिल्हा : आदिवासी भागातील भात कापणी पूर्णत्वाकडे

दिवाळीनंतर कामाला वेग : समाधानकारक पाऊस पडल्याने उत्पन्नात वाढ
नारायणगाव – जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील उत्तरेकडे भातकापणीला वेग आला आहे. कापणी हंगाम जोरात सुरू आहे. इंद्रायणी, रुपम, दप्तरी, जया, रत्ना अशा जातीचा तांदूळ येथे पिकवला जातो. शेती पारंपरिक पद्धतीने केली जाते. लांबलेला पावसाळा व दिवाळीच्या सणात शेतातील भातकापणी राहुन गेल्याने शेतकर्यांची शेतात मोठी लगबग दिसत आहे.
आदिवासी भागातील बहुसंख्य लोकांचे शेती प्रमुख उपजिवीकेचे साधन आहे. त्यात भातलागवड मोठया प्रमाणात केली जाते. जुन जुलै महिन्यात भाताची लावणी झाल्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये भातकापणीला सुरुवात होते. पीक कापणीस तयार झाल्यावर शेतकरी पहाटेच उठुन शेतावर जाऊन भातकापणीला सुरुवात करतात; परंतु परतीचा पाऊस लांबल्याने दुपारपर्यंत भात कापले जाते. भाताची पेंडी ऊन्हाने सुकण्यासाठी जमिनीवर किंवा कातळावर ठेवली जाते.
भात कापणीच्या दिवसांत दुपारच्या भोजनात सर्रास दिवाळी फराळच दिसून येतो. तरुण मुले भाताचे भारे बांधुन झाल्यावर अंगाला खाज सुटलेली असल्याने नदीच्या पाण्यात उड्या मारुन पोहतात. ऊन्हाची तिव्रता अधिक असेल तर रात्री गॅसबत्तीच्या उजेडातही भात कापले जाते. आदिवासी भागात भात कापणीच्या वेळी रात्री हुडहुडी भरायला लावणारी कडाक्याची थंडी पडलेली असते; परंतु खरी मजा रात्रीच्या भात कापणीला असते.
पारंपरीक लोकगीते म्हणत…
शेतकरी पारंपरीक लोकगीते म्हणत भात कापणी करीत असतात. सोबतीला कोरा चहा बनवला जातो. गॅस बत्तीच्या उजेडावर येणारी विविधरंगी फुलपाखरे, टोळ आदी किटक पाहायला मिळतात. तसेच ससा, भेकर प्राण्यांच्या पिल्लांसह पक्षांची अंडीही सापडतात. गावात एखादा मोठा शेतकरी असेल तर तो 15 ते 20 लोकांना भात कापणीस बोलावतो त्याला आदिवासी भागात पटकय म्हणतात. बोकड दिला की एका दिवसात शक्य तेवढे काम करुन देतात. अखेर कापलेल्या भाताची भाताची मळणी करून भात झोडून शेतात पिकवलेले सोने शेतकरी आपल्या धान्याच्या कणगीत साठवून ठेवतो.





