पुणे जिल्हा : 205 पैकी 105 प्रकरणे तडजोडीने मिटवली

स्वयंसिद्धच्या महिला संस्थेचा पुढाकार
जुन्नर – चैतन्य संस्था राजगुरूनगर संचलित संकल्प ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघाच्या माध्यमातून जुन्नर तहसील कार्यालयाच्या आवारात महिला समोपदेशन केंद्र गेल्या12 वर्षा पासून कार्यरत असून जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत या केंद्राच्या माध्यमातून 840 महिला व पुरुषांचे समोपदेशन करण्यात आले. या केंद्रामध्ये वर्षभरात दाखल झालेल्या 214 प्रकरणांपैकी 105 प्रकरणे तडजोडी ने मिटविण्यात आली.
चैतन्य संस्थेच्या सुरेखा क्षोत्रीय , सुधाताई कोठारी , कल्पना पंत , कौशल्या ठिगळे , आनंता म्हसकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नरमधील केंद्राचे कामकाज 2012 पासून सुरू आहे. या केंद्रामध्ये गंगा बुके , मनीषा घोगरे , कांचन वाळुंज या समूपदेशक म्हणून काम पाहत आहे. जुन्नर केंद्रात गेल्या 12 वर्षात सुमारे 2000 प्रकरणे दाखल झालेली असताना यामधील 1200 पेक्षा अधिक प्रकरणे आपसात तडजोडी ने मिटविण्यात आली.
ग्रामीण भागातील महिलांना त्यांचे हक्क अधिकार, कर्तव्य तसेच कायदेविषयक जनजागृती करणे तसेच पीडित महिलांचे समोपदेशन या केंद्राच्या माध्यमातून करण्यात येऊन महिला व मुली यांच्या करिता सुरक्षित वातावरण निर्माण होईल, असे कार्यक्रम केंद्राच्या माध्यमातून आयोजित केले जातात. या केंद्रामध्ये जी विविध प्रकरणे दाखल होतात त्यामध्ये योग्य समोपदेशन करण्यात येऊन ही प्रकरणे तडजोडी ने मिटविण्यात येतात. गेल्या वर्षभरात या केंद्रात 214 प्रकरणे दाखल झालेली होती.
त्यामधील 105 प्रकरणे सामोपचाराने मिटविण्यात आली. कौटुंबिक हिंसाचार अंतर्गत तसेच लैंगिक अत्याचार संदर्भात दाखल झालेली प्रकरणे यामध्ये समोपदेशन करण्यात येऊन हे प्रश्न सोडविण्यात येतात. पतीपतींना परत एकत्र नांदण्यास आणणे तसेच महिलांच्या इतर प्रश्नांबाबत कौटुंबिक प्रश्नांबाबत समोपदेशन करण्यात येते. या केंद्राच्या माध्यमातून समोपदेशन झालेल्या स्त्री पुरुषांच्या घरी भेटी देण्यात येऊन आढावा घेतला जातो.
घटस्फोट न होता…
महिला व मुली यांना सुरक्षित वातावरण मिळावे याकरिता गावागावांत शाळा , महाविद्यालयात कार्यक्रम आयोजित करून मार्गदर्शन करण्यात येते. या समोपदेशन केंद्रामध्ये दाखल झालेले प्रकरण व त्यामध्ये करण्यात आलेले समोपदेशन हे सर्व गोपनीय ठेवले जाते. विवाहितांच्या प्रश्नामध्ये घटस्फोट न होता सामोपचाराने समोपदेशन करण्यात येऊन गैरसमजातून वाद झालेल्या पतीपत्नींना पुन्हा एकत्र आणण्यामध्ये या केंद्राच्या माध्यमातून यशस्वी प्रयत्न केले जातात. गाव पातळीवर आयोजित जनजागृती कार्यक्रमांना महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळतो.





