पुणे जिल्हा : मंचरच्या विकास कामात विरोधकांनी खोडा घालू नये-सुनील बाणखेले

मंचर – मंचर शहर व परिसरासाठी विरोधी पक्ष एक रुपयाचा निधी आणत नसून चाललेल्या विकास कामांना विरोध करत आहे. त्यांनी विकास कामांमध्ये खोडा घालू नये. अन्यथा जशास तसे उत्तर द्यावे लागेल,असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील बाणखेले यांनी दिला.
माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, म्हाडाचे पुणे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना आणि भाजप पक्षाच्या माध्यमातून मंचर (ता. आंबेगाव) येथे मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे चालू असताना विरोधक मात्र चुकीचा प्रचार करून विकास कामांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांचा समाचार घेताना एकलहरे (ता.आंबेगाव) येथे महायुतीच्या वतीने झालेल्या पत्रकार परिषदेत सुनील बाणखेले बोलत होते.
यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष संदीप बाणखेले, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दत्ता थोरात, स्वप्नील बेंडे, विकास बाणखेले, प्रवीण मोरडे, धनेश मोरडे, संतोष डोके,लक्ष्मण थोरात,सुहास बाणखेले, सुरेश घुले, रामदास जाधव, भाजपचे शहर अध्यक्ष योगेश बोऱ्हाडे, आरोग्यदूत सुशांत थोरात, मालती थोरात, अॅड. स्वप्ना खामकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सुनील बाणखेले म्हणाले की, आंबेगाव तालुक्यासह मंचर येथे झालेली विकासकामे व सुरू असलेली विकासकामे ही माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून झाली असून विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. विरोधकांनी आतापर्यंत मंचरसाठी एक रुपयांचा निधी दिला नाही. केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी विरोधक स्टंटबाजी करत आहे. दत्ता थोरात म्हणाले, पूर्वी मंचरची परिस्थिती काय होती व आज मंचर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. आढळराव पाटील, वळसे पाटील यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये विविध विकास कामांसाठी मिळाले आहेत.
अफवा पसरू नये…
संदीप बाणखेले म्हणाले, शाळा, रस्ते, समाज मंदिरे, मशिदी यासह अनेक कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असून आपले नशीब चांगले म्हणून आपल्याला भाजप पक्ष, वळसे पाटील, आढळराव पाटील यासारखे दूरदृष्टी असणारे नेते लाभले आहेत. त्यामुळे विरोधकांनी चुकीच्या अफवा पसरवू नये. झालेल्या विकास कामांमध्ये खोडा घालू नये. तसेच येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत महायुती एकत्र निवडणूक लढणार असून वळसे पाटील, आढळराव पाटील, भाजप आणि शिवसेना नेते जो निर्णय घेतील. तो निर्णय महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मान्य असेल.





