पुणे जिल्हा : मानाच्या प्रतिदिंडी 90 वैष्णवांनाच प्रवेश

माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याप्रसंगी प्रशासनाचा निर्णय
आळंदी – श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा निर्विघ्न पार पडावा, यासाठी प्रस्थान सोहळ्यासाठी मानाच्या 56 दिंडींमधील प्रत्येकी 90 वारकर्यांना देऊळवाड्यात प्रवेश देण्याचा प्रायोगिक निर्णय झाला आहे. प्रशासन, संस्थान कमिटी, दिंडी समाज यांच्या बैठकीत एकमुखाने यास दुजोरा देण्यात आला आहे. प्रस्थान सोहळ्यास होणारी अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठीचा देखील निर्णय झाला आहे, अशी माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख तथा विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी दिली.
यावर्षी 17 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ वद्य अष्टमीला (दि. 29 जून) तीर्थक्षेत्र आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. सोहळ्याच्या नियोजनाबाबत शुक्रवारी (दि. 7) आळंदी देवस्थानच्या भक्त निवासात बैठक झाली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी पालखी सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ, डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, प्रांताधिकारी जोगेंद्र कटारे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गौड, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, दिंडी समाजचे राणू महाराज वासकर, भाऊसाहेब गोसावी, भाऊ महाराज फुरसुंगीकर, मारुती कोकाटे यांच्यासह दिंडी चालक-मालक उपस्थित होते.
महेंद्र महाजन म्हणाले की, मागील दोन वर्षांत पालखी सोहळ्याला काही कारणाने गालबोट लागले आहे. प्रशासनाच्या दृष्टीने सोहळा सुखरूप, तसेच नियंत्रणात ठेवण्यासाठी मागील वर्षी प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी प्रत्येक दिंडीतील 75 वारकर्यांना मर्यादित प्रवेश दिला होता. देऊळवाड्यातील परिसर कमी असल्याने तेथे चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी दिंड्यांमधील वारकर्यांना मर्यादित प्रवेश दिला होता. देऊळवाड्याच्या प्रांगणात 4250 वारकरी बसू शकतात, अशी आकडेवारी प्रशासनाने निश्चित केली होती. हा सोहळा सुरळीत पार पाडावा, यासाठी मानाच्या दिंड्यांतील वारकरी संख्या 90 करणे आवश्यक आहे.
मागील वर्षी पोलिसांबाबत वारकर्यांमध्ये समज-गैरसमज झाले होते. सोहळा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने वारीचे मार्गक्रमण, परंपरा जाणून घेण्याची भूमिका पोलिसांची असते. प्रत्येकाला वारीचे क्षण अनुभवायचे असतात. गेल्या तीन वर्षांपासून गर्दीवरील नियंत्रण नियोजनाबाहेर जात आहे. चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी मानाच्या 47 दिंड्या आणि नऊ उपदिंडी अशा 56 दिंड्यांतील वारकर्यांची संख्या मर्यादित असावी. प्रशासनातील हस्तक्षेप कमीत कमी राहण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
– डॉ. शिवाजी पवार , उपायुक्त, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय
प्रशासनाने मागील वर्षी प्रयोग करू, असे सांगितले होते. त्याप्रमाणे आम्ही भावनांना मुरड घातली. मात्र, आता संख्या वाढवावी. हा आनंद, प्रथा, परंपरेचा सोहळा आहे. यामुळे नियमाचा व परंपरेचा मेळ घालावा.
– बाळासाहेब चोपदार,
लाठीमाराची चौकशी करावी
प्रशासनास सहकार्य म्हणून वारकरी तयार आहेत. मात्र, पालखी सोहळ्यात प्रशासनाचे नियंत्रण सुरू झाल्यापासून सोहळ्यात बेशिस्तपणा येऊ लागला आहे. वर्षानुवर्षे आम्ही स्वतःहून बंधन घालत आहोत. वारीत पोलिसांबरोबर जास्त लोक असतात. तसेच मागील वर्षीच्या गोंधळाची सखोल चौकशी व्हावी. त्या घटनेचा वारकरी, प्रशासनाला डाग नको. नऊ हजार लोक मंदिरात बसतात. संख्येबाबत थेट निर्णय नको. पुढील वर्षीही प्रयोग करावा. मीडियाची संख्या जास्त असते. दरवर्षी भीतीदायक वातावरण नको. अंतिम निर्णय संस्थानचा आहे, असे राणू महाराज वासकर यांनी नमूद केले.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
प्रस्थान दिवशीच्या दिवशी देऊळवाड्यात मानाच्या 47 आणि 9 उप दिंडीतील प्रत्येकी 90 वारकर्यांना प्रवेश द्यावा
प्रशासनातील कर्मचारी, पोलीसमित्र, छायाचित्रकार, मीडिया यांच्या प्रवेशावर निर्बंध आणणार
वारकर्यांना मंदिर प्रवेश पास प्रस्थानाच्या दोन दिवस आधी चोपदार आणि संस्थानकडून देणार
प्रस्थानाच्या दिवशी देऊळवाड्याच्या ओवर्यांमध्ये बसू दिले जाणार नाही





