पुणे जिल्हा : कांदा लागवडीवर परिणाम होणार?

निवडणुकीमुळे ऊस तोडणीचे वेळापत्रक विस्कळीत : टाकळी बेटात गाळप हंगाम उशिरा
प्रफुल्ल बोंबे
जांबूत – राज्यात चालू वर्षीच्या २०२४- २५ या कालावधीतील ऊस गाळप हंगाम दि. १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून विधानसभा निवडणुकीचे मतदान दि. २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. जवळपास महिनाभर गाळप हंगाम उशिरा सुरू होणार असतानाच विधानसभा मतदानामुळे ऊस तोडणी कामगार टोळ्या उशीरा येण्याची शक्यता आहे. परिणामी ऊस तोडणीस विलंब होऊन शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन कोलमडणार आहे. याचा मोठा परिणाम कांदा लागवडीवर होण्याची शक्यता आहे.
शिरूर तालुक्यातील बेट भागातील काठापूर, पिंपरखेड, जांबूत, चांडोह, फाकटे, वडनेर, टाकळी हाजी, कवठे येमाई या गावांत ऊस पिकाबरोबरच मोठ्या प्रमाणात रब्बी कांदा पिक घेतले जाते. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात कारखान्यांची धुराडी पेटली जाते. यावेळी मात्र ऊस गाळप हंगाम उशिरा दि. १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीचे मतदान दि. २० नोव्हेंबर आणि निकाल दि. २३ नोव्हेंबर रोजी असल्याने ऊस तोडणी कामगार मतदान करूनच ऊसाच्या फडावर येण्याची शक्यता आहे.
ऊस टोळ्या मागे पुढे होऊन ऊस तोडणीला डिसेंबरमध्ये वेग येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे.
टाकळी बेट भागात भीमाशंकर, पराग, विघ्नहर, क्रांती शुगर या कारखान्याला शेतकरी ऊस देतात. यापैकी मोठ्या प्रमाणात ऊस हा भीमाशंकर आणि पराग कारखान्याला गाळप होतो. कारखान्यांकडून ऊस लागवड नोंदणी, तारीखनुसार ऊस तोडणी कार्यक्रम आखला जात आहे. प्रथम एका तारखेला नोंद झालेल्या ऊसाची तोड करण्यास एक ते दीड महिना कालावधी लागतो.
कांदा उत्पादकांना चिंता
दरवर्षी शेतकऱ्यांकडून ऊस तोडणी करून खोडवा न ठेवता कांदा व इतर पिकांचे नियोजन केले जाते. यावेळी उशिरा लागवड झालेल्या शेतकऱ्यांना ऊस तोडणीची वाट न पहाता पर्यायी शेतात कांदा लागवडीचे नियोजन करावे लागणार आहे. उन्हाळी हंगाम कांदा पिक लागवडीसाठी डिसेंबर, जानेवारी महिन्यातील थंडीचे पोषक वातावरण अनुकूल असल्याने या कालावधीत कांदा लागवडीसाठी शेतकरी नियोजन करतात. यावेळी मात्र, ऊस तोडणीस विलंब होणार असल्याने शेतकऱ्यांचे कांदा लागवडीचे नियोजन कोलमडणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
ऊस गाळपाची कासवगती
टाकळी बेट परिसरात ऊस गाळपास गती येण्यास डिसेंबर महिन्याचा पंधरवडा उजाडणार आहे. त्यात नैसर्गिक आपत्तीचा धोका नसला तर तोडणी यंत्रणेला वेग येणार आहे. ऐन थंडीत साखर उतारा आणि वजनात वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. मात्र, आडसाली उसाचे गाळप उशिरा होणार आहे. डिसेंबरपासून तोडणी यंत्रणा सुरू झाल्यास त्यानंतर ऊस गाळपासाठी ऐन उन्हाळ्यात कारखाना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.





