Pune District : दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू शिक्रापुरात घटना : एकजण जखमी

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे- नगर महामार्गावरुन रस्ता ओलांडणाऱ्या एकाला दुचाकीची धडक बसून एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला एकजण जखमी झाला आहे.
शिक्रापूर पोलिसांत हरीओम रणजीत गायकवाड (वय १९, रा. खराडी, मूळ रा. औरा शहाजणी, जि. लातूर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिक्रापूर येथील महामार्गालगत असलेल्या जित हॉटेल समोरून एकजण रस्ता ओलांडत असताना अहमदनगर बाजूकडून येणाऱ्या दुचाकीची त्याला धडक बसली. दुचाकीवरील दोघांसह रस्ता ओलांडणारी व्यक्ती रस्त्यावर पडली. दरम्यान, यात अज्ञात व्यक्ती गंभीर जखमी झाली. दुचाकीवर पाठीमागे बसलेला विकास शिंदे हा देखील जखमी झाला.
यावेळी शेजारील नागरिकांनी जखमींना उपचारासाठी शिक्रापूर येथील रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी अज्ञात व्यक्तीचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे घोषित केले. दुचाकीवरील पाठीमागे बसलेला विकास आजिनाथ शिंदे हा जखमी झाला आहे.
याबाबत अमोल बापू नप्ते यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार हनुमंत गिरमकर हे करीत आहेत.





