पुणे जिल्हा : मताधिक्य कमी झाल्याने पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत
– आंबेगाव राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांची मागणी
मंचर – आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार दिलीप वळसे पाटील यांना अनेक गावांमध्ये मताधिक्य कमी पडले, त्याची जबाबदारी म्हणून ज्या गावात मताधिक्य कमी पडले, त्या गावातील राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या तालुका स्तरावर असणाऱ्या संस्थावर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून राजीनामे द्यावेत किंवा पक्ष श्रेष्ठींनी त्यांचे राजीनामे घ्यावेत. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदारपणे करण्यात आली आहे.
आंबेगाव विधानसभा निवडणुकीत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गळ्यात पुन्हा एकदा विजयाची माळ पडली असून त्यांचा विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असता तरी ते निवडून येण्यासाठी लागणारे मताधिक्य घटले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामान्य कार्यकर्ते मात्र नाराज झाले आहेत. वळसे पाटील यांच्याबरोबर गेली अनेक वर्षे काम करणारे व विविध पदे भूषवणारे पक्षाचे गावपातळीवरील नेते, पुढारी, पदाधिकारी यांनी त्यांच्या गावात चांगल्या पद्धतीने काम न केल्यामुळे वळसे पाटील यांचे मताधिक्य घटले आहे. त्यामुळे तालुका पातळीसह गाव पातळीवर पक्षाची पदे असणाऱ्या व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना वळसे पाटील यांनी पदमुक्त करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
आंबेगाव तालुक्यात गेले ३५ वर्षे दिलीप वळसे पाटील हे आमदार म्हणून काम करत असून त्यांच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदे देखील भूषवले आहेत. ३५ वर्षांच्या राजकारणात आंबेगाव तालुका सुजलाम सुफलाम करण्याचे काम त्यांनी केले. आदिवासी भागापासून ते शिरूर तालुक्यातील ४२ गावांपर्यंत त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी विविध विकास कामांसाठी दिला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. वळसे पाटील अजित पवार यांच्याबरोबर गेले. त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांना सोडायला नको होते, असा मतप्रवाह तालुक्यात होता.
मात्र तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने तसेच इतर कामे मार्गे लागण्याच्या दृष्टीने मी अजित पवार यांच्याबरोबर गेलो असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान वळसे पाटील यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली होती. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात असलेले कार्यकर्त्यांची जाळे, तालुक्यातील सर्व गावांमध्ये वळसे पाटील यांच्या माध्यमातून झालेली विकास कामे यांच्या जोरावर वळसे पाटील निदान ४० ते ५० हजाराच्या मताधिक्याने निवडून येतील, अशी आशा कार्यकर्त्यांना होती. मात्र वळसे पाटलांचा विजय हा अतिशय कमी मताधिक्य घेऊन झाल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
इतर कार्यकर्त्यांना संधी द्यावी
सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी द्यावी,अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तालुक्यात वळसे पाटलांचे तेच तेच पदाधिकारी असल्याने त्यांच्याकडून सर्वसामान्य जनतेची कामे होत नाहीत. वळसे पाटलापर्यंत हे कार्यकर्ते सर्वसामान्य लोकांना पोहोचू देत नाहीत. असा आरोप देखील सामान्य कार्यकर्त्यांनी केला आहे.





