पुणे जिल्हा : पोस्टाद्वारे आता पाच मिनिटांत विमा संरक्षण

कागदपत्रांशिवाय अपघात विमा योजना सुरू
तळेगाव ढमढेरे – इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि रॉयल सुंदरम जनरल इन्शुरन्स यांच्या संयुक्त विद्यमाने अपघात विमा योजना सुरू करण्यात आली असून सर्वसामान्य नागरिकांना कमी प्रीमियममध्ये अपघात संरक्षण प्रदान करणे हा या मागचा उद्देश आहे.
10 लाख रुपये विम्याचा कवच असून 18 ते 65 वर्षांपर्यंतचे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. कागदपत्रांशिवाय, पोस्टमनकडून स्मार्टफोन आणि बायोमेट्रिक डिव्हाइसच्या साहाय्याने डिजिटल पद्धतीने 5 मिनिटांत पॉलिसी दिली जात आहे.
अपघाती मृत्यू, कायमस्वरूपी अपंगत्व, आणि अंशतः अपंगत्वासाठी विमा संरक्षण,अपघातामुळे झालेल्या वैद्यकीय खर्चासाठी भरपाई,मृत्यू किंवा अपंगत्वाच्या परिस्थितीत दोन मुलांसाठी 1 लाख शैक्षणिक सहाय्य,रुग्णालयात भरतीसाठी दररोज 500(कमाल 15 दिवस), मृत्यूच्या प्रसंगी 5,000 वाहन खर्च आदी सेवा यामध्ये उपलब्ध आहेत.
नोंदणीसाठी : आधार कार्ड, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते (खाते उघडण्यासाठी 200 रुपये आवश्यक)आवश्यक आहे तर ही योजना संपूर्ण भारतात विविध पोस्ट ऑफिसांमध्ये उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ सर्वानी घ्यावा, असे आवाहन बारामती डाकघर अधीक्षक सुदाम साबळे यांनी केले आहे.





