पुणे जिल्हा : कळमोडीचा थेंबही जाऊ देणार नाही

धरणग्रस्त व कृती समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांचा इशारा
राजगुरूनगर – कळमोडी धरणग्रस्तांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कळमोडी प्रकल्पातील पाण्याचा एकही थेंब इतरत्र जाऊ देणार नाही, असा इशारा कळमोडी धरणग्रस्त व कृती समितीच्या माध्यमातून बांगरवाडी (एकलहरे, ता. खेड) येथील धरणग्रस्त गावातील शेतकऱ्यांच्या बैठकीत देण्यात आला.
खेड तालुक्यातील कळमोडी धरणाचे पाणी स्थानिक प्रकल्पगस्त शेतकऱ्यांना प्राधान्याने न देता ते शिरूर व आंबेगाव तालुक्यातील काही गावांना देण्याचा शासन पातळीवर प्रयत्न सुरू आहे. त्या संदर्भात कळमोडी धरणग्रस्त शेतकऱ्यांची पहिली बैठक बांगरवाडी येथे रविवारी (दि. 15) झाली. या बैठकीला जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, बाजार समितीचे उपसभापती विठ्ठल वनघरे, लक्ष्मण मुके, बाळासाहेब गोपाळे, गणेश बांगर, सोनू दळवी, नाथा तळपे, सुभाष कदम, अजय आंबेकर, नारायण बांगर, संजय कामठे, मारुती कामठे, अविनाश जुंद्रे, जालिंदर मुके, रोहित सुपे, किसनराव गोपाळे यांसह अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, संचालक, सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक ग्रामस्थ व प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
अरुण चांभारे म्हणाले, कळमोडी धरणाची साठवण क्षमता 1.53 टीएमसी एवढी असून त्यातील 0.87 टीएमसी हे पाणी सातगाव पठारच्या आंबेगाव तालुक्यासाठी आरक्षित करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत असून उर्वरीत पाणी चासकमान धरणाच्या पुनर्भरणासाठी दिले जाणार आहे. कळमोडी धरणाची साठवण क्षमता 1.53 जरी असली तरी प्रत्यक्षात मात्र धरण निर्मितीपासून धरणांतर्गत दगड आणि मातीचा राडा रोडा साठवलेला तसाच पडलेला असल्याने प्रत्यक्षात साठवण तेवढी होत नाही. कळमोडी प्रकल्पाच्या दिशादर्शक नकाशामध्ये निर्मितीपासून पुढे खेड तालुक्यातील बांगरवाडी व एकलहरेची बांगरवाडी येथे भीमाशंकर आदिवासी उपसा सिंचन योजना प्रस्तावित आहे त्याबाबतचा शासनाच्या वतीने आढावा घेण्यात आलेला नाही.
चासकमान धरणाचे पहिले आवर्तन दिल्यानंतर धरणाच्या शेवटच्या टोकाला असणाऱ्या साकुर्डी, चिखलगाव, देवोशी या गावांना प्रचंड प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होते. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये आरळा नदीतील पाणीसाठा खाली गेल्यानंतर चार ते पाच महिने संबंधित प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते त्यासाठी 2018 पासून सलग चार गावांतील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी प्राथमिक जलविवाद समितीकडे तक्रार दाखल केली होती; परंतु त्यावर कोणत्याही प्रकारे ठोस निर्णय झालेला नाही.
भविष्यामध्ये तालुक्यातील पाणी इतरत्र हलवून आदिवासींच्या निधीतून बांधण्यात आलेल्या कळमोडी धरणातील पाणी जर चासकमान प्रकल्प बाधित व कळमोडी प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना मिळत नसेल तर या धरणातील पाण्याचा एकही थेंब इतरत्र वळू दिला जाणार नाही.
-बाळासाहेब गोपाळे, अध्यक्ष कृती समिती
प्रकल्पग्रस्तांचा निर्धार
आमदार मोहिते यांनी कळमोडीच्या पाण्याबाबत भूमिका मांडलेली असून आमच्या हक्कांचे पाणी आम्ही जाऊच देणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे; मात्र सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नुकतीच आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे बैठक घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कळमोडीचे पाणी देण्यासाठी लेखी होकार मिळाल्याचे सांगितल्यावर खेड तालुक्यात तातडीने कळमोडी धरणग्रस्त व कृती समिती बैठक झाली. आमचे प्रश्न प्रलंबित असून पाणी नेण्याचा अट्टाहास का? असा पवित्रा घेत कळमोडी धरणातील व धरणातील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत कळमोडी प्रकल्प पाण्याचा एकही थेंब इतरत्र जाऊ देणार नसल्याचा निर्धार प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी व कृती समितीच्या वतीने करण्यात आला.





