Pune Distric: बायपास रस्त्यावर ना पाणी, ना रोलिंग

राजगुरूनगर : राजगुरूनगर-पाईट या राज्यमार्गावर मुख्य रस्त्यावर पुलाचे काम सुरू करण्यासाठी हा रस्ता खोदून ठेकेदाराने बाजूने तात्पुरता रस्ता केला असून हा रस्ता वाहतुकीला अडचणीचा ठरत आहे. या रस्त्यावर पाणी न मारता आणि रोलिंग न करता वाहतूक सुरू केली. मुरूम, मातीच्या भरावात वाहने चालवता येत नसल्याने तसेच उतारावर चाके गरगर फिरू लागल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. ठेकेदार दाद देत नाही. नागरिकांची मात्र मोठ्याप्रमाणात अडचण होत आहे. यावर मार्ग म्हणून पिंपरी बुद्रुक चे माजी सरपंचाने येऊन नव्याने करण्यात आलेला रस्ता बंद केला व मूळ रस्ता वाहतुकी योग्य करून घेतला आणि वाहतूक पूर्ववत झाली.
पाईट रस्त्यावर लादवड (पिंपरी बुद्रुक) येथे बुधवारी (दि. 26) सकाळी घडलेल्या या प्रकाराबाबत वाहनचालक, स्थानिक आणि तालुक्याच्या पश्चिम भागातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. राजगुरूनगर ते पाईट रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. अशातच नव्याने रस्ता आणि काही पुलांची कामे सुरू आहेत. ठेकेदारांच्या ढिसाळ नियोजना मुळे नागरिकांना त्रास होत आहे.
खड्ड्यातून मार्ग काढताना अडचणी निर्माण होत असताना तात्पुरत्या रस्त्यांवर देखील वाहनचालकांना दिव्य पार पाडावे लागत आहे. या मार्गावर पिंपरी बुद्रुक गावाच्या हद्दीत लादवड येथे पुलाचे काम सुरू करण्यासाठी ठेकेदाराने बाजूने तात्पुरता भराव रस्ता केला. बुधवारी (दि. 26) सकाळी मुळ रस्ता उखडायला सुरुवात केली. पर्यायी रस्त्यावर वाहतूक सुरू झाली.
मात्र भराव दबलेला नसल्याने दुचाकीसह, चारचाकी वाहने त्यावरून चालेनाशी झाली आहेत. अनेकांना आलिशान चारचाकी वाहने खाली उतरुन हाताने ढकलून बाहेर काढावी लागली. हैराण झालेल्या संतप्त नागरिकांनी पिंपरी बुद्रुकचे माजी सरपंच मच्छीद्र भुजबळ यांच्याकडे तक्रार केली.
माजी सरपंच भुजबळ यांनी ग्रामस्थांसह घटनास्थळी भेट देऊन काम बंद केले. पर्यायी रस्त्यावर पाणी मारून रोलिंग करेपर्यंत मूळ रस्ता सुरू ठेवण्याचा आग्रह केला.
पर्यायी रस्ता पाणी मारून रोलिंग करून मगच सुरू केला जाईल.
– सतीश नाईकरे पाटील, ठेकेदार





