Pune District : नवप्रविष्ठ पोलिसांनी नक्षल क्षेत्रांमध्ये योगदान द्या

पोलीस महासंचालक व्हटकर : नानवीजमध्ये दीक्षांत संचलन
दौंड – राष्ट्र नक्षलमुक्त करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केल्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलाची जबाबदारी वाढलेली आहे. नवप्रविष्ठ पोलिसांनी नक्षल प्रभावित क्षेत्रांमध्ये सेवा बजावून या कारवाईत योगदान द्यावयाचे आहे, असे आवाहन राज्य राखीव पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी केले आहे.
नानवीज (ता. दौंड) येथे राज्य राखीव पोलीस दल प्रशिक्षण केंद्राच्या ६८ व्या सत्राच्या दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारल्यानंतर बोलताना राजकुमार व्हटकर यांनी हे आवाहन केले.
यावेळी उपमहानिरीक्षक विजयकुमार मगर, प्रभारी प्राचार्य सोमनाथ वाघचौरे, पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य नंदकुमार ठाकूर, समादेशक राजलक्ष्मी शिवणकर (दौंड), प्रभाकर शिंदे ( धुळे), सेवानिवृत्त प्राचार्य रामचंद्र केंडे, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रभारी प्राचार्य सोमनाथ वाघचौरे यांनी सत्रात उत्तीर्ण झालेल्या ६६१ नवप्रविष्ठांना कर्तव्याची शपथ दिली.
राजकुमार व्हटकर म्हणाले, ३१ मार्च २०२६ पूर्वी राष्ट्र नक्षलमुक्त करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेली आहे. मागील दहा वर्षांच्या तुलनेत राज्यात नक्षलींचे अस्तित्व नगण्य राहिलेले आहे. राज्य पोलीस दलाने गोंदिया व गडचिरोली येथे नक्षलविरोधी मोहिम सक्षमपणे पार पाडलेली असून त्यामध्ये राज्य राखीव पोलीस दलाने मोलाचे सहकार्य केले आहे.
प्रशिक्षणांतर्गत आंतरवर्ग परीक्षेत प्रेमकुमार गोरखनाथ कदम (कोल्हापूर) तर बाह्यवर्ग परीक्षेत ब्रह्मानंद सुर्यभान राठोड (काटोल) यांनी पहिले क्रमांक पटकावले. कमांडो परीक्षेत नीरज दीपक शिवणकर (चंद्रपूर) यांनी पहिले स्थान पटकावले.
प्रथमोपचाराचा पुरस्कार अजय अभिमान चिरमाडे यांनी व उत्तम नेमबाजचा पुरस्कार बाजीराव रामदास वाळूज यांनी पटकावला. सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा पुरस्कार ब्रह्मानंद सुर्यभान राठोड (काटोल) यांनी पटकावला. उपप्राचार्य बी. पी. जाधव, एस. डी. सानप यांच्यासह केंद्रातील अधिकारी व अंमलदारांनी संयोजनासाठी सहकार्य केले.
सेवाकाळात संयम ढळू देऊ नका
व्हटकर म्हणाले की, देशात अग्रगण्य व दोन लाख जणांचे सक्षम मनुष्यबळ असणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलात समाविष्ट झालेल्या पोलिसांनी राष्ट्रसेवा करताना राज्यातील तेरा कोटी नागरी जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करावे. प्रशिक्षण काळात संपादन केलेले ज्ञान अद्ययावत करण्याबरोबर सेवाकाळात संयम ढळणार नाही, याची काळजी घ्यावी.





