Pune District : नीरा भिवरा पडता दृष्टी…;माऊलींच्या पादुकांना शाही नीरास्नान

पुणे जिल्ह्याचा निरोप ; सातारा जिल्ह्यात लोणंदवासीयांनी केले जंगी स्वागत : आज तडगावी मुक्काम
राहुल शिंदे
नीरा-
नीरा भिवरा पडता दृष्टी ।
स्नान करिता शुद्ध सृष्टी ॥
अंती तो वैकुंठप्राप्ती ।
ऐसे परमेष्ठी बोलिला ॥
माऊली माऊली नामाचा जयघोष करीत, टाळ-मृदंगाच्या गजरात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात गुरुवारी (दि. 26) माऊलींच्या पादुकांना नीरा नदीच्या पवित्र तीर्थामध्ये शाहीस्नान घालण्यात आले. नीरा स्नानानंतर माऊलींच्या पालखी सोहळा आपल्या वैभवी लवाजम्यासह पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन माऊलींचा पालखी सोहळा सुरू करणार्या हैबतबाबांच्या जन्मभुमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंदमध्ये दीड दिवसांच्या मुक्कामासाठी पालखी सोहळा विसावला. पालखी सोहळा शुक्रवारी (दि. 27) दुपारी तरडगावच्या मुक्कामासाठी मार्गस्थ होणार आहे.
माऊलीचा पालखी सोहळा गुरुवारी साडेसहा वाजता रामायणकार महर्षी वाल्मिकींच्या वाल्हानगरीचा निरोप घेऊन लोणंद मुक्कामी मार्गस्थ झाला. सकाळी आठ वाजता न्याहरीसाठी पिंपरे (खुर्द) येथील अहिल्याबाई होळकर विहिरीच्या समोर विसावाला. पिंपरे व पिसुर्टी ग्रामस्थांनी सोहळ्याचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. ग्रामीण भागातील लोक बेसन – भाकरी, वेगवेगळ्या चटण्या, खरडा, ताज्या रानभाज्या अशी शिदोरी घेऊन आले होते. अर्धा तासाच्या विश्रांतीनंतर पालखी सोहळा दुपारच्या भोजनासाठी व विश्रांतीसाठी नीरेकडे मार्गस्थ झाला.
नीरा नगरीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात माऊलींचा पालखी सोहळा साडेदहा वाजता दाखल झाला.
ग्रामपंचायत कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी चौकात पालखी सोहळ्याचे स्वागत सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह पदाधिकारी व ग्रामस्थांनी केले. अकरा वाजता पालखी सोहळा नीरा नदीच्या काठावरील नयनरम्य विसावास्थळी विसावला. यावेळी नीरा पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी माऊलींच्या पादुका दर्शनासाठी गर्दी केली होती. ग्रामपंचायतीच्या वतीने पालखी तळाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. पंचक्रोशीतील भाविकांनी रांगालावुन माऊलींच्या पालखीतील पादुकांचे नतमस्तक होऊन दर्शन घेतले.
माऊलींच्या पालखी सोहळ्यात नीरा स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पालखी सोहळ्यातील अर्धा टप्पा पुर्ण झाल्यावर माऊलींचा सोहळा सुरू करणार्या हैबतबाबांची जन्मभुमी असलेल्या सातारा जिल्ह्यात प्रवेशापुर्वी माऊलींच्या पादुकांना पुणे व सातारा जिल्हाची सिमा असलेल्या नीरा नदीच्या प्रसिद्ध दत्त घाटावर स्नान घातले जाते. दुपारचे भोजन आणि विसावा घेतल्यानंतर दुपारी दोन वाजता सोहळा मार्गस्थ झाला.
नीरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून सर्वात पुढे तुतारी वादक सलामी देत होते, मानाचे दोन अश्व, भगव्या पताका व विणा घेतलेले वारकरी आणि माऊलींचा फुलांनी सजवलेला रथ नीरा स्नानासाठी वैभवी लवाजम्यासह चालत होता. ब्रिटिशकलीन पुलावरून पालखी सोहळा जाताना मंद वारा सुटला होता. पैल तीरावर पालखीतील पादुका सोहळ्याचे मालक राजाभाऊ पवार-आरफळकर यांच्याकडे देण्यात आल्या. आरफळकरांसह सोहळयाचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, सोहळा प्रमुख भावार्थ देखणे विश्वस्त यांसह सोहळ्यातील मानकर्यांनी माऊलींच्या पादुका दत्तघाटावर आणल्या. माऊली माऊली नामाच्या जयघोषात मोठ्या उत्साहात पादुकांना पवित्र तीर्थात स्नान घालण्यात आले. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी दत्तघाटावर तसेच नदी तिरावर एकच गर्दी केली होती.
पुणे जिल्ह्याच्यावतीने नालासोपाराचे आमदार राजन नाईक, अप्पर पोलिस महासंचालक निखील गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, प्रांताधिकारी वर्षा लांडगे आदींसह ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याला निरोप दिला. तर सातारा जिल्ह्याच्या वतीने खासदार उदयनराजे भोसले, पालकमंञी शंभुराज देसाई, मदत व पुनवर्सन मंत्री मकरंद पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, साताराचे जिल्हाधिकारी संतोष पाटील आदींनी यांनी जोरदार स्वागत केले. त्यानंतर लोणंदवासीयांनी पालखीचे स्वागत करून पालखी विसावली.
स्नान सोहळा एक तास उशिरा
संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा दरवर्षी एक वाजता स्नानासाठी प्रस्थान करत असतो; मात्र यावर्षी साताराच्या बाजूने वाहतूककोंडी झाल्याने माऊलींचा सोहळा वेळेवर स्नानासाठी मार्गस्थ होऊ शकला नाही त्यामुळे हा सोहळा दुपारी दोन वाजता स्नानासाठी मार्गस्थ झाला. यासंदर्भात मालक राजाभाऊ आरफळकर यांनी नाराजी व्यक्त केली, त्याचबरोबर सातारा पोलिसांच्या नियोजनावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. वाल्हे येथून या सोहळ्याने साडेसहा वाजता प्रवास सुरू केला यावर्षी नीरा येथे सोहळा अर्धा तास अगोदर आला; मात्र सातारा जिल्ह्यातील पोलिसांनी नियोजनात मिसळपणा केल्याने वारकर्यांना त्यांचे वाहने पुढे नेणे अवघड झाले होते त्यामुळे स्वयंपाकाचे वाहने मुक्कामाच्या ठिकाणी पोहचू न शकल्याने रात्रीचे जेवण हे आता उशिरा होणार असल्याने सोहळा मालकांनी नाराजी व्यक्त केली.





