पुणे जिल्हा : विकासासाठी वळसे पाटलांसारख्या दूरदृष्टी नेत्याची गरज

नरहरी झिरवळ : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात प्रचार दौरा
मंचर – आंबेगाव तालुक्यातील आदिवासी जनता भाग्यवान आहे. त्यांना शांत, संयमी, दूरदृष्टीचे नेतृत्व असले दिलीप वळसे पाटील लोकप्रतिनिधी म्हणून लाभले आहे. विकासाला गती देण्यासाठी दिलीप वळसे पाटील सारखा दूरदृष्टी नेत्याची गरज आहे. आदिवासी बांधवांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन विधानसभेचे उपाध्यक्ष आणि आदिवासी नेते नरहरी झिरवळ यांनी केले.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर येथे आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ महाविजय निर्धार सभेत विधानसभेचे उपाध्यक्ष व आदिवासी नेते नरहरी झिरवळ बोलत होते. याप्रसंगी सहकारमंत्री महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील,
माजी खासदार व म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, किरणताई वळसे पाटील, रमेश येवले, भाजपाचे जिल्हा संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे, पक्षाचे तालुकाध्यक्ष विष्णू काका हिंगे, आदिवासी नेते सुभाष मोरमारे, प्रकाश घोलप, नंदा सोनवले, जनाबाई उगले, इंदुबाई लोहकरे, रूपाली जगदाळे, सरिता दाते, सरपंच कविता इष्टे, अमोल अंकुश, आदी मान्यवर उपस्थित होते.
झिरवळे म्हणाले मी राज्यात अनेक आदिवासी भागात फिरून तेथील आदिवासींच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सध्याचे महायुतीचे सरकार हे विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. लाडकी बहीण योजना फायदेशीर ठरली. त्यामुळे यंदाची दिवाळी खूपच गोड झाली. विरोधकांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी आदिवासींचं आरक्षण जाणार, संविधानात बदल होणार. अशा खोट्या थापा मारून मते मिळवली; परंतु त्याचा आता आपल्याला पश्चाताप होत आहे.
महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील म्हणाले गेल्या सात निवडणुकांमध्ये मला माझ्या आदिवासी बांधवांनी मोलाची साथ दिली. मी देखील आदिवासी बांधवांच्या समस्या, प्रश्न सोडवत आलो आहे. आता या भागातील काही गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. तो देखील पुढे काही दिवसांमध्ये मार्गी लागेल. लोकसभेच्या निवडणुकीत मी आजारी असल्याने मला आढळरावांच्या प्रचारात येता आले नाही. विरोधकांनी मात्र अपप्रचार करून, भूल थापा मारून मते मिळवली. आता निवडून गेल्यावर मात्र ते आदिवासी बांधवांना विसरले आहेत. यावेळी माजी सभापती संजय गवारी, सुभाष मोरमारे, इंदुबाई लोहकरे, जयसिंग एरंडे यांची मनोगते झाली.
आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागाचा कायापालट केवळ दिलीप वळसे पाटील यांनीच केला. माळीण दुर्घटनेच्या वेळी वळसे पाटील या भागात तळ ठोकून होते. त्यानंतर त्यांनी माळीन पुनर्वसनाचा प्रश्न अतिशय झपाट्याने मार्गी लावला. आदिवासी जनतेचे आणि वळसे पाटलांचे हे जवळचे नाते आहे. आदिवासी भागातील प्रत्येक गावामध्ये सर्वात जास्त निधी वळसे पाटील यांनीच दिला आहे.
-शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार





