Pune district : विकासकामांपेक्षा श्रेयवादाचा कल्लोळ!

आजी-माजी आमदारांकडून विकासकामे आपणच मंजूर केल्याचे दावे
रामचंद्र सोनवणे
राजगुरुनगर – खेड तालुक्यातील विकासकामे मंजूर करण्यावरून आजी – माजी आमदारांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत या श्रेयवादाची लढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
खेड – आळंदी विधानसभा निवडणुकीत दिलीप मोहिते पाटील यांचा पराभव झाला. बाबाजी काळे नवीन आमदार झाले. राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार पवार गट) यांचे सरकार स्थापन झाले तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे बाबाजी काळे खेड तालुक्याला आमदार म्हणून लाभले. पुणे जिल्ह्यात शिवसेनेचे ते एकमेव आमदार म्हणून निवडून आले.
निवडणूक झाल्यानंतर खेड तालुक्यात विकासकामांवरून राजकीय वातावरण तापू लागले. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आणि विद्यमान आमदार बाबाजी काळे यांच्यात विकास कामांवरून श्रेय घेण्याचे सत्र सुरू झाले. वास्तविक विकासकामे कमी आणि श्रेयवादाची लढाई जास्त असा संघर्ष तालुक्यात सुरु आहे.
श्रेयवादाच्या लढाईत खेड तालुक्याला जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) पहिल्या टप्प्यात निधी वाटपात वंचित राहावे लागले. ग्रामीण रस्ते आणि इतर जिल्हा रस्त्यांच्या विकास कामांसाठी एकही काम खेड तालुक्यात मंजूर झाले नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. आजी माजी आमदारांमधील विकासकामांच्या मागण्यावरून एकमत नसल्याने पालकमंत्री अजित पवार यांनी खेड तालुक्याला निधी मंजुरीत तूर्तास मागे ठेवले होते. दुसर्या टप्प्यात खेड तालुक्याला भरपूर निधी मिळेल, अशी आस असली तरी तालुक्यातील श्रेयवादाची लढाई सुरूच राहणार आहे.
नुकताच खेड – आळंदी विधानसभा मतदार संघातील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) रस्त्यांसाठी 118 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. खेड आळंदी विधानसभा मतदार संघातील विकासकामांना गती मिळणार असल्याचा दावा करीत हा निधी आपणच मंजूर केला असल्याचे आमदार बाबाजी काळे यांनी केला. त्यांनी 28 एप्रिल 2025ला दिलेल्या पत्राची प्रत प्रसारमाध्यमांकडे दिली. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनीही खेड – आळंदी विधानसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी 118 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यासाठी आपण प्रयत्न केले आहेत, असे सांगत पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे 25 जुलै 2024च्या पत्राची प्रत प्रसारमाध्यमांना देत हा निधी आपल्या पाठपुरावा केल्याने मंजूर झाल्याचे सांगितले आहे
. यामुळे रस्त्यांसाठी नक्की कोणी पाठपुरावा केला. आणि कोणाच्या पाठपुराव्यामुळे खेड तालुक्याला हा निधी मंजूर केला, याबाबत नागरिकांमध्ये मात्र चर्चेचा विषय बनला आहे. यावरून आजी आणि माजी आमदारांमध्ये श्रेयवादाची लढाई आहे, याबाबत तालुक्यात मोठी चर्चा आहे.
सामान्य नागरिकांना काय हवंय
खेड तालुक्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे काही ठिकाणी रस्त्यांची कामे अपूर्ण असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. आजी माजी आमदारांच्या श्रेयवादात या रस्त्यांची कामे ठप्प झाली की काय, असा प्रश्न नागरिकांना पडत आहेत सोशल मीडियावर टाकल्या जाणार्या पोस्ट नागरिकाच्या चर्चेचा विषय बनल्या आहेत. नक्की कोणते काम कोणत्या आमदाराने आणले, कोणत्या कामात खो घातला. कोणते काम कोणत्या मर्जीतील ठेकेदाराला दिले, असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या चर्चेला येत आहेत.
आगामी निवडणुकांवर लक्ष
खेड तालुक्यातील राजगुरुनगर, चाकण आळंदी या तीन नगर परिषदासह जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक तोंडावर आल्या आहेत. विकास कामे रखडलेली कामे रस्त्यांची दुरवस्था पाणी वीज आरोग्य आदी प्रश्न प्रलंबित आहेत. काही सोडवले आहेत, काही सुटण्याच्या मार्गावर आहेत. असे असताना दोन्ही आमदारांचा विकास कामांचा श्रेयवाद आगामी येणार्या या निवडणुकांवर होणार का? याचे उत्तर मात्र सध्यातरी गुलदस्त्यात आहेत.





