पुणे जिल्हा : जिरायती भागात संमिश्र प्रतिसाद

दोन्ही गटांचे बलाबल सम पातळीवर : मतदानाने सत्तरी ओलांडली
मोरगाव – बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त मतदान चुरशीने झाले. पश्चिम भागात कुठलाही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडले. ग्रामीण पट्ट्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार पक्षावर शरदचंद्र पवार पक्ष यामध्ये चुरशीचे मतदान झाले आहे. ही निवडणूक अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार यामध्ये चुरशीची होणार, असे वातावरण निवडणुकीपूर्व होते. मात्र, सूज्ञ मतदारांनी ग्रामीण भागात दोन्ही गटांना संमिश्र मतदान केल्याची चर्चा आहे. मात्र, त्यातही अजित पवार यांचे पारडे जड असल्याचे दिसत आहे.
बारामती तालुक्याच्या पश्चिम पाटातील मोरगाव, तरडोली, मुर्टी, आंबी बुद्रुक, आंबी खुर्द, लोणी भापकर या भागात शांततेत मतदान पार पडले. गेल्या महिन्याभर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पहावयास मिळाल्या. परंतु कुठलाही अनुचित प्रकार न घडता ग्रामीण भागात शांततेत मतदान पार पडले. आंबी बुद्रुक 68, आंबी खुर्द 77.90, जोगवडी 63, मोरगाव 70, मुर्टी 71, तरडोली 70, लोणी भापकर येथे 68 मतदान झाले. त्यामुळे ग्रामीण पट्ट्यात सरासरी 70 टक्के पेक्षा जास्त मतदान झाले.
ग्रामीण भागामध्ये 22 गावांतील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनाचा प्रश्न या निवडणुकीमध्ये चांगलाच गाजला. दोन्ही पक्षाच्या वतीने शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने बारामतीमध्ये आयटी पार्कसारख्या सुविधा निर्माण होणार असल्याने आश्वासन दिले.
त्यामुळे तरुण वर्गांचा कौल कोणाला जाणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र ग्रामीण भागातील शेत सिंचनाचा प्रश्न सोडता रस्ते, सभामंडप, ड्रेनेज लाईन, पिण्याचे पाणी योजना, तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय आदी झालेला विकासामुळे अजित पवार यांचे पारडे जड वाटत असल्याची चर्चा मतदारांमधून पुढे येत आहे. तरुण वर्गाचे नव्याने वाढलेले मतदान महत्त्वाचे ठरणार आहे. निवडणुकीमध्ये महिला वर्गाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात जाणवत होते.
२२ गावांतील शेतकरी अजूनही आशावादी
आंबी खुर्द येथे पुरुषांच्या मानाने महिलांची संख्या कमी प्रमाणात होती. मुर्टी, मोरगाव, तरडोली, लोणी भापकर येथे महिला मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान झाले आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा फायदा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होण्याची शक्यता आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोरगाव, तरडोली, लोणी भापकर या बूथ ठिकाणी परिस्थितीचा आढावा घेतला. तरुण वर्गाची बातचीत केली. एकूण झालेली टक्केवारीचा आढावा घेतला. ग्रामीण भागामध्ये गेल्या 40 वर्षापासून शेती सिंचनाचा प्रश्न सातत्याने भेडसावत आहे. मात्र, हा प्रश्न या निवडणुकीनंतर तरी मार्गी लागेल या भोळ्या आशेने २२ गावांतील युवा पिढी व शेतकरी वर्ग लक्ष लावून आहेत.





