Pune District: दुधाची तहान ताकावर भागली; नारायणगाव आगारात 20 ऐवजी 10 नवीन लालपरी मंजूर

नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील नारायणगाव आगारासाठी नवीन 20 एसटी बसची मागणी करण्यात आलेली असली तरी नवीन 10 एसटी बस देण्यात येणार असल्याने दुधाची तहान ताकावर भागवावी लागणार आहे. नवीन 10 एसटी बस पैकी 5 नवीन एसटी बस नारायणगाव डेपोच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.
नवीन पाच एसटी बस पैकी तीन एसटी बस नारायणगाव-जुन्नर-पुणे-संगमनेर-पुणे-नारायणगाव तर दोन एसटी बस नारायणगाव-पुणे-नाशिक-पुणे-नारायणगाव असा दररोज अडीच हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून नारायणगाव डेपोस लाखोचे उत्पन्न मिळवून देणार आहे. आणखी नवीन पाच एसटी बस लवकरच मिळणार असून त्याचे मुंबई वाहतुकीसाठी नियोजन करण्यात येणार असल्याचे आगारप्रमुख वसंत अरगडे यांनी नमूद केले.
नारायणगाव बस स्थानकात अर्धे काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम एप्रिल महिना अखेर पूर्ण होणार आहे. काँक्रिटी करणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नारायणगाव बस स्थानक पूर्ण क्षमतेने वापरात येणार असून काँक्रिटीकरणाच्या कामामुळे प्रवाशांनी सहकार्य करावे अशी विनंती आगर प्रमुखांनी केली आहे.
दरम्यान, नारायणगाव बस स्थानकाच्या काँक्रेटी करणाच्या दोन्ही बाजूला गटारीचे बांधकाम करण्यात येत असून त्यावर बंदिस्त जाळी बसवावी अशी विनंती प्रवाशांनी केली आहे. गटार बंदिस्त न केल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपघात झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रोहिदास पवार यांनी स्पष्ट केले आहे.
तो रस्ता बंद करावा; वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
नारायणगाव बस स्थानकातून मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी रस्ता ठेवण्यात आलेला आहे. परंतु त्या रस्त्यामुळे अनेक दुचाकी व चारचाकी वाहन चालक बस स्थानकाच्या आवारात गाडी पार्किंग करून वाहतुकीस अडथळा निर्माण करीत असतात. याशिवाय बाजारपेठेतील हॉटेल आनंद कॅफे जवळ जुन्नरला जाणार्या अनेक खासगी वाहतूक करणार्या जीप अवैधरीत्या उभ्या राहून बस स्थानकातील प्रवाशांची वाहतूक करून अडचण निर्माण करतात. त्यामुळे बस स्थानकाच्या आवारातून मुख्य बाजारपेठेत जाणारा रस्ता तात्काळ बंद करावा अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. बस स्थानक परिसरात सुरू असलेल्या अवैध वाहतुकीवर कारवाई करण्यास वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.





