पुणे जिल्हा : वर्षभरात दूधाचे दर 13 रुपयांनी गडगडले

पशुखाद्यांच्या किंमती वाढता वाढे : उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात
वाल्हे – मागील वर्षी एप्रिल महिन्यात दूध उत्पादक शेतकरीवर्गाला दुधाला प्रति लिटर 38 रूपये भाव होता. यावर्षी तो तब्बल 13 रुपये कमी होऊन 25 रुपये झाला आहे. पशुखाद्यांच्या वाढलेल्या किंमती व कमी झालेले दर यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आला आहे.
राज्य सरकारने, एप्रिल-2023 मध्ये दुधाला किमान दर 38 रुपये प्रति लिटर देण्याचे आश्वासित केले होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात प्रति लिटर 34 रुपये दर निश्चित केला. सप्टेंबर महिन्यापासून दुधाच्या दरात सतत घसरण होऊन जानेवारी महिन्यात अनुदानाच्या माध्यमातून हा दर 30 रुपयांवर आणण्यात आला होता;
मात्र, दूध उत्पादक शेतकर्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान योजनेतील दूध अनुदाचे पैसे अनुदान कालावधी संपून जवळपास 20 दिवस उलटूनही अद्यापपर्यंत अनुदान दूध उत्पादक शेतकरीवर्गाच्या बँक खात्यात जमा झाले नाही; शासनाकडून दूध अनुदान कालावधी संपल्यानंतर दूध खरेदी दराचा निर्णय बदलला. 27 रुपये प्रति लिटर असलेला खरेदी दर 25 रुपयांवर आणण्यात आला आहे. मात्र, या निर्णयामुळे शेतकर्यांना मोठा तोटाच झाला आहे. ही बाब तीव्र दुष्काळात दूध उत्पादक शेतकरीवर्गासाठी घातक असल्याची प्रतिक्रिया शेतकर्यांमधून व्यक्त होत आहे.
शेतकर्यांवर आर्थिकसंकट
जानेवारीच्या शासन निर्णयानुसार 3.2 फॅट व 8.3 एसएनएफसाठी 5 रुपये प्रतिलिटर अनुदानाचा निर्णय घेण्यात आला. यानंतर दोन महिन्यांनी अनुदानाचा फेरविचार केल्यानंतर 13 मार्चच्या मंत्रिमंडळ बैठकीत 3.5 फॅट व 8.5 एसएनएफसाठी 25 रुपये दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकर्यांवर आर्थिकसंकट घोंगावत आहे.
नफा कमवणारी व्यवस्था
दुकानातून गायीच्या पिशवीतील दूध सर्वसामान्य ग्राहकांस प्रतिलिटर 52 ते 55 रूपये देऊन खरेदी करावे लागत आहे; मात्र, दूध उत्पादकच्या हातात प्रतिलिटर 25 रुपये मिळतात. गायीच्या प्रतिलिटर दुधामागे 27 ते 30 रूपये नफा कमवणारी व्यवस्था दूध उत्पादक व्यवसायाला लागलेली किड आहे.
वाढलेले पशुखाद्याचे दर आणि चाराटंचाईमुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला आहे. बाजारात मिनरल वॉटर पेक्षाही गायीचे दूध स्वस्त झाल्याने शेतकर्यांच्या पदरी शेणाशिवाय हाती काहीच शिल्लक राहत नसून, भरीस भर म्हणून शासन देत असलेल्या प्रती लिटर पाच रुपये अनुदानाचे निकष बदलल्याने, शेतकर्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे
– जयवंत भुजबळ, दूध उत्पादक शेतकरी, वाल्हे
पशुखाद्य, पेंड, भुसा, भरडा आदींच्या 50 किलोच्या एका बॅगच्या किंमतीत वर्षभरात 200 रुपयांनी वाढ झाली आहे. आता हिरव्या चार्यासाठी पाणी नसल्याने कुठेतरी विकत मिळणार्या वैरणीचे दर मागील वर्षांपेक्षा दीड पटीने वाढले आहेत; त्यातच दूध खरेदी दरात वाढ होण्याऐवजी घट होत आहे; दावणीची जनावरे सोडता येत नाहीत व सांभाळणेही परवडत नाही.
– भाऊसाहेब पवार, पशुपालक, वाल्हे





