Pune District: दुचाकीसाठी ‘एमएच 42 बीआर’ क्रमांक

बारामती : खासगी संवर्गातील दुचाकी वाहनांसाठी बारामती उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे ‘एमएच 42 बी आर क्रमांकाची नवीन मालिका सुरु करण्यात येणार आहे. आकर्षक क्रमांक राखून ठेवण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ज्या खासगी चारचाकी वाहनांसाठी आकर्षक तसेच पसंतीचा क्रमांक हवा असेल त्यांनी (दि.24) सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 वाजेच्यादरम्यान धनाकर्षासह (डी.डी.) विहित नमुन्यात अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी (दि.24) सायंकाळी 5 वाजता कार्यालयीन सूचना फलकावर लावण्यात येईल.
यादीतील अर्जदारांना लिलावासाठी जास्त रकमेचा डी.डी. जमा करावयाचा असेल, त्यांनी (दि.25) दुपारी 3.30 वाजेपर्यत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा. त्याच दिवशी दुपारी 4 वाजता संबंधित अर्जदारांसमोर लिफाफे उघडून विनिर्दिष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रक्कमेचा धनाकर्ष भरलेल्या व्यक्तीस नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाणार आहे.
(दि.26) केवळ दुचाकी वाहनाकरिता आकर्षक तसेच पसंती क्रमाकांचे विहित शुल्कासह अर्ज सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत स्वीकारले जाईल. यादीतील अर्जदारांना लिलावासाठी जास्त रकमेचा डीडी (दि.27) दुपारी 3.30 वाजेपर्यंत जमा करता येईल.
त्याचदिवशी दुपारी 4.30 वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात उपस्थित पात्र व्यक्तीसमोर लिफाफे उघडून विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केलेल्या अर्जदारास नमूद पसंती क्रमांक वितरित केला जाईल. एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क परत करता येणार नसल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यानी कळविले आहे





