रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा, काही कागदपत्रेही जाळली, जामखेड ग्रामीण रुग्णालयाचा महाप्रताप ! जमखेड – येथील ग्रामीण रुग्णालयाचे जिल्हा उपरुग्णालयात रूपांतर झाले असून, इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने तात्पुरत्या स्वरुपात असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचेही दुसर्या जागेत स्थलांतर करण्यात आले.मात्र, रुग्णालयाची लाखो रुपयांची औषधे जुन्या जागेवर उघड्यावर टाकण्यात आली असून, यामध्ये रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा उघड्यावर टाकण्यात आला आहे तर काही कागदपत्रेही जाळण्यात आली आहे. आमदार रोहित पवार यांच्या पाठपुरवठ्यामुळे जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे जिल्हा उपरुग्णालयात रुपांतर होऊन जुने रुग्णालय पाडून त्याठिकाणी ४ मजली इमारतीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. रुग्णालयाला जागा नसल्याने नव्या इमारतीच्या बाजूला पत्राच्या शेडमध्ये रुग्णालय सुरू करण्यात आले होते, मात्र तेथेही बांधकाम करायचे असल्याने रुग्णालयाचे स्थलांतर जुन्या पंचायत समितीच्या इमारतीत करण्यात आले. गरिब रुग्णांचा आधार असलेल्या ग्रामीण रुग्णालयात चांगली सुविधा मिळावी, या आशेने आलेल्या रुग्णांना इतर काही औषधांसह आवश्यक असल्यास बाहेरूनही खरेदी करून आणावी लागते. चांगली सुविधा मिळावी म्हणून रुग्णही प्रतिप्रश्न न करता निमूटपणे सहन करतात, मात्र स्थलांतर झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे लाखो रुपयांची औषधे उघड्यावर टाकण्यात आली आहे. कोरोना काळात रेमडेसिव्हिर इंजेक्शन गोरगरिबांना मिळत नव्हते, मात्र ग्रामीण रुग्णालयाने हे इंजेक्शन उघड्यावर टाकले आहे. त्याबरोबर पीपीई किट, मास्क ,विविध प्रकारचे औषधेचे बॉक्स उघड्यावर ठ्वले आहे. काही औषधांची एक्स्पायरी तारीख संपलेलीही नाही, तीही औषधे टाकण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशांक वाघमारे यांची नुकतेच बदली झाली आहे. डॉ. वाघमारे यांच्या काळात रुग्णालयाचे स्थलांतर झाले होते मात्र, त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. ग्रामीण रुग्णालयांची रुग्णसेवा रामभरोसे झाली आहे. वास्तविक शासनाच्या अखत्यारीत ग्रामीण रुग्णालय असल्याने सर्व सेवा सुविधा अपेक्षित होत्या. परंतु परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. प्राथमिक उपचाराखेरीज अन्य कोणतेही उपचार सुविधा नसल्यामुळे होत नाहीत. शासनाच्या आरोग्यसंबंधी विविध सवलती व योजना आहेत. परंतु ग्रामीण रुग्णालयात त्या मिळत नाहीत. खासगी दवाखान्याचा खर्च सर्वसामान्यांना परवडत नाही, त्यांना ग्रामीण रुग्णालयाचाच आधार घ्यावा लागतो. मात्र, सुविधाच नसल्याने अनेकांना खासगी दवाखान्याची वाट धरावी लागते. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा असे झाले आहे. रुग्णालयातील शस्त्रक्रिया, क्ष किरण, वॉर्ड यासारखे सर्व विभाग ओस पडले आहेत. कुटुंब नियोजनाचे ऑपरेशनही होत नाही. वैद्यकीय अधिकारी कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेत नाहीत. कारण शस्त्रक्रियेसाठी लागणारी साधनसामुग्री नसल्याने अधिकारी धजावत नाहीत. गंभीर स्वरुपाचे रुग्ण पुढील उपचारासाठी रवाना केले जातात. शासनाच्या आरोग्य विभागाकडून बरीच उपकरणे येतात. त्या उपकरणांचा लाभ रुग्णांना देता दिला जात नाही.