पुणे जिल्हा : ‘माऊली माऊलीच्या’ जयघोषात माऊलींचे निरास्नान

– पुणे जिल्ह्यातील भाविकांनी सोहळ्याला दिला निरोप
राहुल शिंदे
नीरा – चला जाऊ पंढरीला | प्रथम भेटू सोपानाला ||
मग करू मल्हारीची वारी 😐 विसावू वाल्मीकाच्याद्वारी||
निरा नदी काठी आराम करू | पवित्र कुंडी स्नान करू||
पांडुरंग राहतो इथे हजर | स्नान घालितो ज्ञानोबाला सत्वर ||
ऐसा सोहळा पाहणे नाही | जगी दुसरीकडे |
‘ माऊली माऊली’चा जयघोष आणि हरिनामाचा गजर करत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना आज नीरा नदीमध्ये शाहीस्नान घालण्यात आले. आळंदीहून पंढरपूरला आषाढी वारीसाठी निघालेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याने आज सकाळी (दि. ६) वाल्हे येथील मुक्काम आटोपून सकाळी सहा वाजता नीरानगरीकडे मार्गक्रमण केले. सकाळची न्याहरी होळकर विहिरीजवळ झाल्यानंतर हा सोहळा पुन्हा निरेकडे मार्गस्थ झाला.
वाटेत पिंपरे खुर्द येथे ग्रामस्थांनी माऊलींचे स्वागत केले आणि माऊलींचे दर्शन घेतले. यानंतर हा पालखी सोहळा पुढे मार्गस्थ झाला. सकाळी सकाळी ११ वाजता या पालखी सोहळ्याचे नीरा नगरीमध्ये आगमन झाले. तर दुपारी दीड वाजता माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत शाहीस्नान घालण्यात आले.
शनिवारी (दि.६) रोजी सकाळी ११ वाजता नीरा नगरीमध्ये आलेल्या या माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप, नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे, त्याचबरोबर उपसरपंच राजेश काकडे, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, संचालक जितेंद्र निगडे, माजी उपसभापती लक्ष्मणराव चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य संदीप धायगुडे, प्रमोद काकडे, राधा माने, अनंता शिंदे, अभिषेक भालेराव, अनिल चव्हाण, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्रम दगडे, बाबूराव दगडे यांसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थांनी केले. स्वागताला नीरा आणि परिसरातील अनेक मान्यवर मंडळी आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागतानंतर हा सोहळा दुपारच्या विसाव्यासाठी नीरा नदीकाठी असलेल्या पालखीतळावर विसावला. दुपारचं भोजन आणि विश्रांती झाल्यानंतर दुपारी एक वाजता हा पालखी सोहळा नीरा स्नानासाठी मार्गस्थ झाला. ब्रिटिशकालीन पुलावरून माऊलींचा हा लवाजमा मोठ्या डौलाने नीरा नदी पार करून दत्तघाटाकडे मार्गस्थ झाला. दुपारी दीड वाजता दत्त घाटावर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना शाही स्नान घालण्यात आले. यावेळी ‘माऊली माऊली’ असा एकच जयघोष आसमंतामध्ये दुमदुमला. स्नान सोहळ्यानंतर हा पालखी सोहळा हैबतबाबांची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद नगरीकडे मार्गस्थ झाला.
यावेळी सातारा जिल्हा प्रशासनाकडून या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. पुणे जिल्ह्याच्या प्रशासनाकडून सातारा जिल्हा प्रशासनाकडे हा पालखी सोहळा सुपुर्द करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा आणि सातारा जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, चंद्रकांत वाघमारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलवडे, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे,
तहसीलदार विक्रम राजपुत, उपविभाग पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पुरंदरच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार, अन्नपुरवठा उपायुक्त समिक्षा चंद्राकार, जेजुरी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे, आरोग्य अधिकारी डॉ.विक्रम काळे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विराज काकडे, माजी सभापती अतुल म्हस्के, राजेश चव्हाण, कांचन निगडे इत्यादी उपस्थित होते.
माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा
दुपारी संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा नीरा नदीकाठी विसवल्यानंतर नीरा आणि परिसरातील भाविकांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या ठिकाणी मोठ्या रांगा लागल्या होत्या. लोकांना सुखकर दर्शन घेता यावे म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने दर्शन रांगेची सोय करण्यात आली होती. नीरा, जेऊर, मांडकी, गुळूंचे, कर्नलवाडी, राख, नींबूत, सोमेश्वरनगर त्याचबरोबर पाडेगाव या गावातील ग्रामस्थांनी माऊलींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पुरंदर तालुक्यातून जात असताना या वर्षी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सासवड जेजुरी या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून मोठी काळजी घेतली जात होती. जेजुरी परिसरात आल्यावर पोलीस उपविभागाचे पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे यांच्या टीमने चोख बंदोबस्त ठेवला होता. पालखी सोहळ्यामध्ये वाहतुकीचा कोणताही अडथळा होऊ नये म्हणून काळजी घेतली जात होती. त्याचबरोबर वारीच्या मार्गावर रात्रीच्या वेळी झोपलेल्या वारकऱ्यांना वाहनांचा त्रास होऊ नये म्हणून नीरा शहरापासूनच वाहनांना पालखी मार्गावर जाण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे हा सोहळा कोणत्याही अडथळ्याविना पार पडला.





