पुणे जिल्हा : 110 गावांचा पाठिंबा मराठा आरक्षण

दररोज एका गावातील युवक उपोषणास बसणार
राजगुरुनगर – मराठा आरक्षण मिळावे खाजगी तत्वावर नोकरभरती बंद करावी आदी मागणीसाठी खेड तालुका क्रांती मोर्चाच्या वतीने सुरु झालेल्या साखळी बेमुदत उपोषणाचा तिसरा दिवस असून तालुक्यातील सुमारे 110 गावांचा पाठिंबा मिळाला असून दररोज एका गावातील युवक उपोषणास बसणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे तालुका अध्यक्ष मनोहर वाडेकर, अंकुश राक्षे यांनी दिली.
राजगुरूनगर येथे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी दि 1 ऑक्टोबरपासून साखळी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
पहिल्याच दिवशी या आंदोलनाला शरद पवार, खासदार अमोल कोल्हे, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी भेट देत उपोषणकर्त्यांशी चर्चा केली; मात्र शासन पातळीवर याबाबत अद्यापही दखल घेतली नाही अथवा अधिकारी या ठिकाणी आले नाहीत.
या साखळी उपोषणाचा आज तिसरा दिवस असून रेटवडीमधील 9 ग्रामस्थ आज उपोषणास बसले आहेत.
यामध्ये अंकुश राक्षे (3रा दिवस), किरण पवार, संजय पवार, मंगेश वाबळे, मनोहर वाडेकर, धनंजय रेटवडे, अमोल काळे, माणिक रेटवडे, अक्षय भगत, अमोल वाबळे यांचा समावेश आहे. त्यांना पाठिंबा म्हणून गावातील माजी सरपंच द्वारकानाथ टीचगे, दिलीप पवळे, दिलीप दुबे, राजू जाधव, वसंत रेटवडे, आनंदा काळे, संतोष राऊत, धनंजय मुळिक, सीताराम आरुडे गुरुजी हे उपस्थित होते.
प्रहार संघटना उपोषणात सहभागी
या आंदोलनास खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे, पंचायत समितीच्या माजी उपसभापती वैशाली जाधव, सतीश राक्षे, प्रहार संघटना खेड तालुका अध्यक्ष जीवन टोपे, तुळशीराम तनपुरे, विष्णू गुंडाळ, भिकाजी भालेकर, राजेंद्र सुपेकर, नवनाथ वरपे ह्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपोषणात सहभाग घेतला.





