पुणे जिल्हा : दिशा ॲकॅडमीतून अनेक विद्यार्थी घडतील

पद्मश्री आनंद कुमार : सुपर-३० बॅच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
बारामती – सन्मानित विद्यार्थ्यांना पुढील JEE व NEET परीक्षांसाठी दिशादर्शक मार्गदर्शन दिशा ॲकॅडमी देत आहेच. दिशा ॲकॅडमीतील अनुभवी शिक्षक व शिक्षणाचे योगदान दिशा देणारे आहे. या ॲकॅडमीतून अनेक विद्यार्थी घडतील. भविष्यात देखील आपण दिशा ॲकॅडमीसोबत असू, अशी ग्वाही सुपर ३० चे संस्थापक, जनक पद्मश्री आनंदकुमार (पटना, बिहार) यांनी दिली.
बारामती येथे कविवर्य मोरोपंत नाट्य मंदिरात दिशा ॲकॅडमीने सुपर-३० बॅच अंतर्गत निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पद्मश्री आनंद कुमार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आत्मविश्वास आणि प्रामाणिक प्रयत्नांनी यशस्वी होण्याचा मूलमंत्र दिला. विद्यार्थी, पालकांशी दिलखुलास संवाद साधतांना पद्मश्री आनंदकुमार यांनी गुणवंत विद्यार्थ्यांची जिद्द, दर्जेदार शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनावर यावर मार्मिकतेने प्रकाश टाकला. सुपर- ३० संकल्पना प्रत्यक्षात कशी साकारत गेली, याची प्रेरणादायी कहाणी विद्यार्थ्यांसमोर मांडली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष, डॉ. अरुण कुमार सिन्हा, शास्त्रज्ञ इस्त्रो यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशसेवा करण्याची प्रेरणा दिली. यावेळी महाराष्ट्र प्रोफेशनल टिचर्स असोसिएशन विजय पवार, शास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. दिलीप देशमुख, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे तसेच विविध कोचिंग सेटरचे संस्थापक, शिक्षक व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता. सोहळ्यात D-SAT परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विशेष सन्मानचिन्हे आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.
दिशा ॲकॅडमीचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदम यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत दिशा संस्थेची उद्दिष्टे आणि शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोत्तम सुविधा विद्यार्थ्यांना देण्याच्या आपल्या कटिबद्धतेचा पुनरूच्चार केला. यावेळी शास्त्रज्ञ डॉ. अरुण कुमार सिन्हा यांनी संवाद साधताना अंतराळ आणि संशोधनातील अनेक संधीची ओळख पालक व विद्यार्थ्यांना करून दिली. भारताच्या संशोधनातील गौरवशाली घटना त्यांनी उलगडून दाखवल्या. संशोधनातून करिअरच्या अनेक संधी देणाऱ्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी जरूर यावे यावर भर देत त्यांनी दिशा ॲकॅडमीच्या वाटचालीचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रगतीची प्रेरणा घेण्यासाठी आठवी ते दहावीतील विद्यार्थी-पालक आणि मान्यवर नागरिकांनी कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शविली होती. सुपर ३० बॅच साठी निवड होण्यासाठी आणि स्कॉलरशीप मिळविण्याची संधी १० वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अजूनही उपलब्ध असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात या संधीची फायदा करून घ्यावा, असे आवाहन प्रा. डॉ. नितीन कदम यांनी केले आहे. दिशा परिवाराने आभार मानले.
लहानपणापासून सर्वांगीणतेसाठी विशेष काळजी
दिशा शिक्षण संस्थेची माहिती देताना संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रा. रूपाली कदम यांनी लहान वयापासूनच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संस्थेच्या प्रत्येक युनिटमध्ये विशेष काळजी घेतल्याचे नमूद केले. येत्या काळात केवळ भारतात नव्हे तर जगभरात दिशाच्या विद्यार्थ्यांच्या यशाची पताका फडकताना दिसेल, असा विश्वास रूपाली कदम यांनी व्यक्त केला.





