Pune District : मंचर एसटी बस आगाराला गुरुवारी टाळे ठोकणार

मंचर : मंचर बस स्थानक (ता.आंबेगाव) येथे महाळुंगे पडवळ येथील हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी मंचर एसटी आगाराच्या एस.टी. बस गाड्यांच्या आणि इतर गैरसोयीबाबत एसटी महामंडळाचे लक्ष वेधण्यासाठी आमरण उपोषण व टाळा ठोको आंदोलन गुरुवार, दि.१ रोजी करणार आहे.अशी माहिती हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी दिली.
आंबेगाव तालुक्यातील मंचर (तांबडेमळा) एस.टी. आगाराचे उद्घाटन दोन वर्षांपूर्वी संपन्न झाले. त्यानंतर अगोदरच्या काळात आंबेगाव तालुक्यातील १४३ गावांमध्ये राजगुरुनगर आणि नारायणगाव एसटी आगाराच्या एस.टी. बसेस सुरळीत चालू होत्या.परंतु मंचर एसटी आगार चालू झाल्यापासून संपूर्ण तालुक्यातील सेवा विस्कळीत झाली आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग, अनेक महाविद्यालय, शाळा अशी मोठी विद्यालये आहेत. सध्या मंचर एसटी आगारात एकूण १७ एसटी बसेस आहेत. त्यापैकी पाच एसटी बसेस लांब रूटवर चालतात व उर्वरित १२ एसटी बसेस १४३ गावांच्या फेऱ्या मारतात. १२ एसटी बसेसने १४३ गावांमध्ये कशी काय सेवा पोहोचेल.
असा सवाल प्रवाशांनी निर्माण केला आहे. एसटी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार, दि. १ मे ला मंचर बस स्थानक येथे हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर व पदाधिकारी आमरण उपोषणास बसणार आहे. तसेच त्यानंतर पदाधिकारी मंचर-तांबडेमळा एसटी आगाराला टाळे ठोकणार आहे. काही जनतेचा उद्रेक झाला तर संबंधित प्रशासन जबाबदार राहतील,याची नोंद घ्यावी.व तरी लवकरात लवकर आंबेगाव तालुक्यातील मंचर एसटी आगारामध्ये वाढीव एस.टी.बसेस व सुविधांची पूर्तता करावी.अशी मागणी करण्यात आली.
तांबडेमळा-मंचर एसटी आगारात डांबरीकरण नाही. त्यामुळे धुळीचे साम्राज्य आहे. एसटी आगारात पेट्रोल पंप नसल्याने एसटी बसेस ४० किलोमीटर रिटर्न डिझेल भरण्यासाठी मोकळी न्यावे लागते. आगारात कर्मचारी यांना रेस्ट रूम, पिण्याचे पाणी व इतर भौतिक सुविधांचा अभाव आहे.याकडे एसटी महामंडळाने गांभीर्याने लक्ष द्यावे.अशी मागणी होत आहे.
-सागर काजळे, उपाध्यक्ष, भैरवनाथ पतसंस्था, मंचर.





