Pune District : खूनाचा प्रयत्न करुन फरार झालेले 12 तासांच्या आत जेरबंद

लोणी काळभोर : खुनाचा प्रयत्न करून फरार झालेल्या 4 अल्पवयीन आरोपींसह अनोळखी 6 जणांना पोलिसांनी 12 तासांच्या आत जेरबंद केल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली.
या संदर्भात सविस्तर माहिती देताना ते पुढे म्हणाले अक्षय अशोक बदर (वय 28), प्रसाद खंडु ढोबळे (वय 21, दोघेही रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली) व इतर 4 विधी संघर्षीत बालके यांना ताब्यात घेण्यात आले आहे. 28 एप्रिल रोजी मध्यरात्री पावणेदोन वाजता सूरज प्रशांत वाघमारे (वय 16, रा. गोपाळपट्टी मांजरी बुद्रुक ता. हवेली) हा त्याच्या 3 मित्रांसह प्रेम (रा. कवडीपाट टोलनाका) याच्याकडे असलेल्या पैशांची मागणी करण्याकरिता गेले होते.
त्यांना प्रेम याचे घर माहिती नसल्याने, कवडीपाट टोलनाका येथे थांबलेल्या 3 अनोळखी व्यक्तींकडेे त्यांच्यापैकी शंकर कदम याने प्रेम याच्या घराबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांनी त्यास कारण विचारले असता त्याने प्रेमकडून पैसे घ्यायचे आहेत असे सांगितले. त्यावर 3 अनोळखी इसमांनी त्यांचे आणखी अनोळखी साथीदार तेथे बोलावून त्यांना हॉकी स्टीक व धारदार हत्याराने मारहाण करुन गंभीर जखमी केले होते. या संदर्भात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीने प्रेम (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) व त्याचे सोबतचे अनोळखी इसम यांचेविरुध्द तक्रार दाखल केली होती. गुन्हा दाखल झाला त्यावेळी आरोपींची नावे निष्पन्न नव्हती. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे व सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी तत्काळ पोलीस पथके तयार करुन आरोपींचा शोध चालू केला.
फरार आरोपी प्रेम याचा गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास करुन गुन्ह्यातील इतर आरोपींची नावे निष्पन्न केली. गुन्ह्यात अनोळखी आरोपी असूनही तसेच ते गुन्हा केल्यानंतर फरार झाले असताना देखील, 12 तासांच्या आत लोणी काळभोर पोलीसांनी कौशल्यपुर्णरित्या तपास करून तांत्रिक व भौतिक पुराव्यांच्या आधारे आरोपींची नावे निष्पन्न करुन त्यांना गुन्ह्यात अटक केले आहे. त्यामुळे अतिशय गंभीर स्वरुपाचा गुन्हा 12 तासांच्या आत उघडकीस आणण्यात लोणी काळभोर पोलीसांना पुन्हा एकदा यश आले आहे.





