पुणे जिल्हा : माळशिरसकर आक्रमक झाले अन् पाणी आले

पुरंदर उपसाचे टेकवडीतील व्हॉल्व्ह केला अधिकार्यांनी बंद
वाघापूर – पुरंदर उपसा जलसिंचन योजनेची पाणी मागणी असूनही माळशिरस गावाला पाणी न दिल्याने ग्रामस्थांनी आक्रमक होत टेकवडी येथील व्हॉल्व्ह बंद करून अखेर पाणी माळशिरस येथे पोहोचवले व पाणी आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
दिवसेंदिवस पुरंदर तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्रटंचाई जाणवत आहे. अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात दुरुस्तीसाठी ही योजना बंद होती दुरुस्तीनंतर सुरू झाल्यावर प्रत्येक गावाची पाण्याची मागणी वाढली. माळशिरस ग्रामस्थांनी वारंवार मागणी करून देखील पाणी मिळाले नाही. अधिकारी फोन उचलत नाही.
पैसे भरून देखील पाणी मिळत नसल्याने माळशिरस ग्रामस्थ आक्रमक झाले काहीही करून शनिवारी (दि. 30) पाणी माळशिरसला आणायचे हे ठरवून गावातून टेकवडी येथील व्हॉल्व्ह जवळ जमले. वरिष्ठ अधिकार्यांच्या कानावरती घालून पाणी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हालायचे नाही, असे ठरवले. माळशिरस ग्रामस्थांची एकजुट पाहुन अखेर पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या अधिकार्यांना माघार घ्यावी लागली व माळशिरसला पाणी देण्यात आले.
टेकवडी येथील व्हॉल्व्ह बंद केल्याने माळशिरस ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यावेळी माळशिरसचे उपसरपंच अशोक यादव, सोसायटीचे अध्यक्ष सदाशिव डोंबाळे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष माऊली यादव, ग्रामपंचायत सदस्य शरद यादव, भाऊसाहेब यादव, अदिनाथ यादव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.





