पुणे जिल्हा : आधुनिक युगात शेती करण्याच्या पद्धतीत मोठा बदल

– नांगरणी,पेरणी,कापणी सारख्या कामांसाठी ठरतोय ट्रॅक्टर महत्त्वाचा
मंचर – आधुनिक युगात शेती पद्धतीत मोठा बदल पाहायला मिळत आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे शेतकरी आता कमी कष्टात अधिक उत्पादन घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. यात ट्रॅक्टरचा वापर हा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.
काळाच्या ओघात पारंपरिक शेती पद्धती मागे पडल्या आहेत. पूर्वी बैलांचा वापर करून नांगरणी, पेरणीसारखी कामे करत होता. मात्र, वाढते तापमान, बदलते हवामान आणि बैलांची देखभाल यासारख्या कारणांमुळे शेतकरी आता ट्रॅक्टरकडे वळत आहेत. ट्रॅक्टरच्या वापरामुळे नांगरणी,पेरणी,कापणी यासारखी कामे जलद आणि सोपे झाली आहेत. यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होत आहे.
शिवाय ट्रॅक्टरच्या साहाय्याने इतर शेतीची कामे जसे की खत पांगविणे, जमीन सपाट करणे इत्यादी देखील सहज करता येतात. सध्या पेरणीचा हंगाम असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरचा वापर करत आहेत. यामुळे शेतीची कामे वेळेवर पूर्ण होण्यास मदत होत आहे.
ट्रॅक्टरचा वापर केल्याने वेळेची बचत होते. कमी मेहनत लागते व खर्चही कमी होतो. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. मात्र, ट्रॅक्टरच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणावर होणारे परिणाम लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करण्याकडे लक्ष दिले पाहिजे.
शेणखत होतेय दृष्टीआड
पूर्वी शेतकऱ्याकडे बैल असल्यामुळे शेणखत तयार होत होते आणि त्यामुळे सेंद्रिय अन्नधान्य पिकत होते. आज-काल शेतीसाठी बैलांचा वापर कमी झाल्याने अगदी बैलपोळ्याच्या सणालाही बैल कमी पाहायला मिळत असल्याची दृश्य पहावयास मिळत आहे. एकंदरीत, शेतीत ट्रॅक्टरचा वाढता वापर यामुळे शेती क्षेत्रात मोठे बदल होत आहेत





