Pune District : शिरदाळे परिसरातील विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

– एसटीच्या अनियमित वेळापत्रकाचा ज्येष्ठ प्रवाशांनाही फटका
मंचर – मंचर एसटी आगाराच्या अनियंत्रित कारभारामुळे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिरदाळे-धामणी परिसरातील विद्यार्थ्यांचे शाळेत जाण्या-येण्यासाठी हाल होत असल्याचे पहायला मिळत आहे. मिळेल त्या गाडीला हात करून विद्यार्थी जीव मुठीत धरून धोकादायक प्रवास करत आहेत. महिलांच्या कामाला जाणाऱ्या पिकअप गाडीला लटकून तर कधी रस्त्यावरील अनोळखी गाड्यांना हात करून शिक्षणासाठी महाविद्यालयात पोहोचावे लागते.
पावसाळ्याचे दिवस असल्याने एसटी गाड्या वेळेवर आणि पुरेशा नसल्याने विद्यार्थ्यांचे आणि जेष्ठ नागरिकांचे मोठे हाल होत आहे. त्यात एस.टी. महामंडळाचे वेळापत्रक बिघडले असल्यामुळे त्यात आणखीन भर पडली आहे. निदान शाळा भरण्याच्या वेळेत आणि सुटण्याच्या वेळेत दुर्गम भागात एस.टी. वेळेत जाईल, याची दक्षता जर घेतली. तर विद्यार्थ्यांना असा जीवघेणा प्रवास करावा लागणार नाही. त्यात ज्यावेळी विद्यार्थी गाडीला हात करतात. त्यावेळी त्यांना टाळता येत नाही आणि गाडीत बोजा असला तरी विद्यार्थ्यांना घेऊन यावे लागते असे खाजगी गाडी व्यावसायिक अनिकेत पोखरकर यांनी सांगितले.
आता शाळा नियमित सुरू झाल्या आहेत. महामंडळाने शाळेच्या वेळेत एस.टी.बस उपलब्ध करून विद्यार्थी, जेष्ठ नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी. विद्यार्थ्यांनी देखील अनोळखी गाडीमध्ये न बसता ओळखीच्या गाड्यांमध्ये बसून सुरक्षित प्रवास करावा. गाडीच्या हुडावर, कॅबिनवर बसून प्रवास करणे चुकीचे असल्याने भविष्यात अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण?असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.
एस.टी.बसच्या वेळापत्रकाबाबतीत कायमच अनियमितता पाहायला मिळते. परंतु आता शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शाळेच्या वेळेत तरी गाड्या वेळेवर सोडाव्यात म्हणजे विद्यार्थ्यांना, असा जीवघेणा प्रवास करावा लागणार नाही. शाळा सुटल्यानंतर एका पीक अप गाडीवरच्या हुडावर विद्यार्थ्यांना घरी येण्यासाठी प्रवास करावा लागतो. घाट रस्ता आहे,कुठं काही अपघात घडला तर याला जबाबदार कोण? त्यामुळे एस.टी. बस सुरळीत झाल्या तर हा प्रवास विद्यार्थ्यांना टाळता येईल.
पुरेशा गाड्या उपलब्ध कराव्यात
विद्यार्थ्यांनी देखील अशा अनोळखी वाहनांमध्ये आणि जीवघेणा प्रवास करणे टाळायला हवे. एसटी महामंडळाने एसटी गाड्या पुरेश्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करावी.अशी मागणी वारंवार होत असतानाही एसटी महामंडळाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.





