Pune District : शिवरायांनी उभे केलेले गड, किल्ले जपण्याचे काम करुया

वीसगाव खोरे : शिवरायांचे विचार घराघरात, मनामनात पोहोचले पाहिजे. हे विचार पुढे न्यायचे असतील तर शिवरायांनी उभे केलेले गड किल्ले व इतिहासाला उजाळा देऊन ते जपण्यासाठी काम करुया, असे प्रतिपादन खासदार निलेश लंके यांनी केले. किल्ले रायरेश्वर (ता.भोर) येथील गड किल्ले संवर्धन व स्वच्छता मोहीमप्रसंगी शिवभक्तांसमोर बोलत होते.
आपला मावळा संघटनेचा शुभारंभ खासदार लंके यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी खासदार लंके यांनी रायरेश्वर मंदिरात महादेवाचे दर्शन व शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून उपस्थित शिवभक्तांसमवेत स्वराज्याची शपथ घेऊन मोहिमेस सुरुवात करण्यात आली. यावेळी मंदिर परिसरात स्वच्छता व वृक्षारोपण करून वीज व सौर उर्जाचे दिवे, शिवभक्तांना पिण्याच्या पाण्याचे रांजण, सूचनादर्शक फलक बसविण्यात आले. सभामंडपाच्या खांबांना रंग देण्यात आला. ग्रामस्थांना रेनकोट वाटप केले. पेविंग ब्लॉग, डस्टबीन आदी उपयुक्त वस्तू देऊन विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळेची पाहणी खासदार लंके यांच्याकडून करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून गड किल्ले संवर्धन आणि स्वच्छता मोहीम करण्याचा निर्णय घेतला असून आतापर्यंत शिवनेरी व धर्मवीर गडावर स्वच्छता व संवर्धन करण्यात आले आहे. पवित्र भूमी असलेला रायरेश्वर किल्ला निवडला असून असल्याचे सांगून या मोहिमेच्या माध्यमातून ‘आपला मावळा’ या संघटनेची स्थापना करून कमिटी नेमण्यात आली आहे. या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी प्रत्येक गडावर जाऊन गड किल्ले व संवर्धन संकल्पना रावणार असल्याचे खासदार लंके यांनी सांगितले. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी रामेश्वर निमसे, कार्याध्यक्षपदी सुधीर लाकुडझोडे, उपाध्यक्षपदी दौलत गांगडे व योगिराज गाडे, सचिवपदी सिताराम काकडे, सहसचिवपदी अमोल झेंडे तर खजिनदारपदी अल्ताफ शेख यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. उत्रौली ( ता.भोर) येथील प्रयोगशील शेतकरी विठ्ठल शिवतरे यांच्या घरी लंके यांनी भेट दिली.त्यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.या प्रसंगी सोनार सिध्द भैरवनाथ वि.का.सोसायटीचे चेअरमन सचिन शिवतारे, संचालक चंद्रकांत शिवतरे, ग्रामस्थ उपस्थित होते.
पावसात रायरेश्वरावर चढाई
सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असतानाही लोखंडी शिडीवरुन रायरेश्वरावर खा.लंके सहित वयोवृद्ध, महिला,लहान मुलांसह तरुणांनी वृक्षांची रोपे, टिकाव फावडे, मोठाले रांजण, डस्टबीन, लोखंडी फलकांसह अवजड वस्तू नेल्या. तसेच वीज प्रवाह बंद करून पावसात विजेच्या खांबावर चढून दिवे जोडण्याचे काम करण्यात आले.





