पुणे जिल्हा : वडगाव रासाईत बिबट्या जेरबंद

दोन बालकांच्या बळीनंतर वनविभाग सतर्क
मांडवगण फराटा – वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे (दि.२६) शेलारवाडी येथे आदिनाथ पापळ यांच्या शेतातील वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. त्यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
मांडवगण फराटा परिसरात (दि.१८) ऑक्टोबर रोजी बिबट्याच्या हल्ल्यात ७ वर्षाचे बालक बळी गेले होते. पुन्हा (दि.१५) नोव्हेंबर रोजी एक ४ वर्षाचा मुलागा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला होता. त्यावेळी परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ संतापून आक्रमक झाले होते.
जुन्नर उपवनसंरक्षक अमोल सातपुते व तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी आश्वस्त केले. बिबट्याला पकडण्यासाठी मोहीम आणखी तीव्र स्वरूपात करण्यात येईल.
काही उपाययोजना सुचविल्या, त्याप्रमाणे नियोजन केले आहे. दोन महिन्यांपासून बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने ठिकठिकाणी एकूण २५ पिंजरे लावले आहेत. बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी असे एकूण ३५ जण रात्रंदिवस कार्यरत आहेत. १५ ठिकाणी कॅमेरे लावले आहेत. दोन ड्रोन कॅमेऱ्याद्वारे पाहणी सुरू आहे. प्रत्येक पिंजऱ्यात भक्ष्य ठेवले आहे. तरीही बिबटे पिंजऱ्यात अडकत नव्हते. हा एक कुतूहलाचा विषय झाला होता.
वनविभागाने अनेक ठिकाणी घरांना सौर जाळीचे कुंपण करून दिले आहेत. इतक्या प्रयत्नातून एक तरी बिबट्या सापडला.पकडलेल्या बिबट्याला माणिकडोह येतील बिबट केंद्रात दाखल केला आहे. तो नरभक्षक आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी त्याच्या केस व लाळेचे नमुने फॉरनसिक लॅबला पाठविणार असल्याचे संबंधित अधिकारी यांनी सांगितले. या भागातील सर्वच बिबटे पकडून जंगलात सोडावेत अशी मागणी शेतकरी ग्रामस्थांनी यावेळी केली आहे.
प्राण्याचा मानसिकतेचा अभ्यास करून उपाययोजना
तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी सांगितले की, बिबटे पिंजऱ्यात का अडकत नाहीत, याची माहिती प्राण्यांच्या मानसिकतेकचा अभ्यास करणारे तज्ज्ञ यांच्याकडून माहिती घेऊन पुढील उपाययोजना करण्यात येतील.





