Pune District : बेल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळ

बेल्हे – जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील विद्यानगरी परिसरात गेल्या 5 ते 6 दिवसांपासून दोन बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. या भागात दोन शाळा असल्याने विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या परिसरात ताबडतोब पिंजरा लावण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
बोरी रस्ता परिसरात दोन बिबट्यांनी अनेक दिवसांपासून थैमान घातले आहे. रोज बिबट स्थानिकांना दिसत आहे. महिन्याभरापूर्वी वन विभागाने लावलेल्या पिंजर्यात या परिसरात एक बिबट्या जेरबंद झाला होता.
दोन दिवसांपूर्वी मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या मागील शिवाजी गुंजाळ यांच्या घरासमोरील कुत्र्याला बिबट्याने नेले. तर सोमवारी (दि. 15) मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या शाळेच्या मैदानात बिबट्यांचा वावर सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला. तेथे जवळच असणार्या सदाशिव बोरचटे यांच्या बंगल्याच्या कंपाउंडमध्ये रात्री एकच्या सुमारास दोन बिबटे सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाले.
यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे. सध्या पिंजरा उपलब्ध नसून येत्या एक – दोन दिवसात या ठिकाणी पिंजरा लावण्यात येईल, अशी माहिती बेल्हे वनपाल नीलम ढोबळे यांनी दिली.





