Pune District : वाल्हे परिसरात बिबट्याची दहशत

वाल्हे : पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावठाणशेजारील चाहूरवस्ती येथे रात्रीच्या वेळेस शेतामध्ये अवघ्या 20 फुटांवर बिबट्याचे दर्शन घडल्याने शेतकर्यांची चांगलीच धांदल उडाली. सध्या रब्बी हंगामाची लगबग सुरू आहे. शेतशिवार गहू, हरभरा, ज्वारी, पालेभाज्या आदी पिकांनी फुलून गेला आहे. बुधवारी (दि. 8) मध्यरात्री सुकलवाडी व पिंगोरी भागामध्ये बिबट्याने शेळी तसेच सुकलवाडी येथे म्हशीच्या रेडकावर हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना घडली.
बिबट्याच्या हल्ल्यानंतर शेतकर्यांमध्ये घबराट पसरली असून, शेतात काम करताना शेतमजूर घाबरत आहेत. गुरुवारी (दि.9) रात्री वाल्हे परिसरातील चाहूरवस्ती मधील शेतामध्ये बिबट्याचे हलीम इनामदार यांना रात्रीच्या वेळी आपल्या शेतात बिबट्याचे दर्शन झाले.
शेतात काढून ठेवलेल्या हिरव्या हरभर्यांच्या पेंढ्या नेण्यासाठी भोर येथील व्यापारी भारत शेडगे व त्यांच्या पत्नीसमवेत चारचाकीतून शेतात आले होते. हरभरा चारचाकी वाहनामध्ये भरत असताना शेडगे यांनी गाडी सुरू केल्यानंतर मोटारीच्या दिव्यांच्या उजेडात अवघ्या 20 फुटांवर शेडगे यांच्या पत्नीला प्राण्याचे डोळे चमकल्याचे दिसून आले.
त्यांनी आरडाओरडा करत इनामदार यांना गाडीमध्ये बसण्यासाठी बोलावले.तिघेही गाडीत बसल्यानंतर मोटारीचे दिवे बंद केले असता बिबट्या त्यांच्या दिशेने चाल करून येताना दिसताच. त्यांनी आरडाओरडा करून मोटार पळविल्याने बिबट्याने अंधारामध्ये धूम ठोकली.
याबाबत माजी सरपंच अमोल खवले यांनी वनविभागाचे अधिकारी वनपाल राहुल रासकर व वनरक्षक पोपट कोळी यांना कळविले.
वाल्हे परिसरात बिबट्याबाबत जनजागृती करण्यात येणार असून शेतकरी, महिला यांनी शेतात काम करत असताना दक्ष राहावे, असे आवाहन वनपाल राहुल रासकर यांनी केले.





