लवकरच वनविभाग पिंजरा लावणार – थोरात
मंचर – आंबेगाव तालुक्यातील मंचर जवळील गांजाळे मळा, एस कॉर्नर येथे बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या कर्मचार्यांनी जागेची पाहणी करून तेथे लवकरच पिंजरा लावणार असल्याची माहिती मंचर येथील भाजपचे नेते संजय थोरात यांनी दिली.
मंचर नगरपंचायतच्या पूर्वेला असलेल्या गांजाळेमळा, एस कॉर्नर परिसरात दिवसा व रात्री बिबट्याचा वावर वाढला. त्यामध्ये मेंढपाळाच्या घोड्यावरती हल्ला केल्याने घोडा जखमी झाला होता. तसेच शेतकर्यांचे ही पशुधनाची हानी झाली आहे.त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी संजय थोरात यांची भेट घेऊन बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार थोरात यांनी मंचर वनपरिक्षेत्राधिकारी स्मिता राजहंस यांच्याशी संपर्क करून पिंजरा लावण्याची मागणी केली; अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे सांगितल्यानंतर त्या ठिकाणी वनाधिकारी संभाजीराव गायकवाड यांनी येऊन पाहणी केली.
रात्रीचे गस्त त्याठिकाणी करून बिबट्याबाबत जनजागृती केली जाईल व मेंढपाळाला आर्थिक सहाय्य करण्यात येईल असे सांगितले. त्यावेळी संजय थोरात म्हणाले की, शेतकर्यांनी आणि मेंढपाळांनी घाबरून जाऊ नये. वनविभागाच्या वतीने लवकरच पिंजरा लावला लावण्यासाठी कार्यवाही केली जाईल तसेच जनजागृती केली जाईल, असे सांगितले.