पुणे जिल्हा : पुरंदर उपसा योजनेचे गळतीचे ग्रहण संपेना

एअरव्हॉल्व खरचं नादुरुस्त की आणखी काही?
वाघापूर – दुष्काळी पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदार बनवण्याचे स्वप्न पूर्ण करणा-या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी गळतीचे ग्रहण अद्यापही सुटलले नाही. याचा सर्वाधिक फटका लाभार्थी गावातील शेतक-यांना बसत आहे. यामुळे पैसे भरूनही पाहीजे त्या प्रमाणात पाण्याचा दाब मिळत नाही. यामुळे या योजनेची गळती थांबवण्याची मागणी सर्वसामान्य शेतकरी वर्गातून होत आहे.
सध्या पुरंदर तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात पुरंदर उपसा जलसिंचन योजना वरदान ठरली आहे. सध्या या योजनेचे उन्हाळी हंगामातील पाणी सुरू आहे. मात्र, जसा उन्हाळी हंगाम सुरू झाला तसा या योजनेला अनंत अडचणी उभ्या राहिल्या. या योजनेला सुरुवातीपासुनच गळतीचे ग्रहण लागले आहे. या योजनेचे एअरव्हॉल्व मोठ्या प्रमाणात गळतात. अनेक ठिकाणी पाइपलाइन गळत आहे. यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जाते. याचा भुर्दंड पैसे भरुन पाणी घेणा-या लाभार्थी गावातील शेतक-यांना बसतो आहे.
माळशिरस-सासवड रस्त्यालगत नादुरुस्तच
आंबळे व टेकवडी येथील माळशिरस-सासवड रस्त्यालगत असणारे एअरव्हॉल्व कित्येक दिवसापासून नादुरुस्त असल्याने या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. योजनेचे अनेक एअरव्हॉल्व मोठ्या प्रमाणात गळतात. यामळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जाते. याचा भुर्दंड मात्र नियमित पैसे भरणार्या शेतकर्यांच्या वरती पडतो. ही योजना सुरू झाल्यापासून फक्त मोटारीचेच काम केले मात्र या ठिकाणी असणार्या लाईनवरील एअरव्हॉल्वचे काम का केले जात नाही असा प्रश्न येथील शेतकर्यांना पडला आहे.
शेतकरी अडचणीत
उन्हाळी हंगामात ही योजना वारंवार बंद पडते. योजनेचे योग्य नियोजन होत नसल्याने पाणी असून देखील शेतकर्यांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने पिकांचे संगोपन करण्यात शेतकरी वर्गाला खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.





