Pune District : अपहरण केलेल्या बालिकेची मुंबईतून सुटका

शिरूर : शिरूर शहराच्या जोशीवाडी येथून एका १० वर्षीय बालिकेचे अपहरण करणाऱ्या आरोपीस अटक करून बालिकेची मुंबईतून सुखरूप सुटका करण्यात शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला यश आले.
जोशीवाडी (ता. शिरूर) येथून गुरूवारी (दि. १३) सकाळच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपीचा माग काढण्यात आला.
शिरूर पोलिसांच्या तपास पथकाने जलद हालचाल करत आरोपीला मुंबई येथे जाऊन ताब्यात घेतले. अपहरण झालेल्या बालिकेची सुखरूप सुटका केली. कारवाईत शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, महिला पोलीस अंमलदार गीता सुळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
शिरूर पोलिसांनी या प्रकरणात वेगवान आणि अचूक तपास करत तात्काळ आरोपीला अटक केली. अल्पवयीन बालिकेला सुरक्षितपणे आपल्या नातेवाईकांकडे सुपुर्त केले. शिरूर पोलिसांच्या तपास पथकाने केलेल्या या कामगिरीचे स्थानिक नागरिकांकडून व वरिष्ठांकडून कौतुक केले जात आहे.
शिरूर शहरापासून मुंबईपर्यंत फुटेज तपासले
१० वर्षीय मुलीचे अपहरण झाल्यानंतर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून तातडीने शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दिवसरात्र तपास करत शिरूर शहरापासून मुंबईपर्यंत शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण करून आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत. अंमलदार थोरात, शिंदे यांचे विशेष कौतुक केले जात आहे.





