Pune District : खेड सेझ पोलीस चौकी पूर्णवेळ सुरू राहावी

दावडी : खेड सेझ क्षेत्रात मारामारीच्या घटना सातत्याने होत असल्याने पोलीस चौकीसाठी अतिरिक्त मनुष्यबळ तसेच सुरक्षात्मक उपाययोजना याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस अधीक्षक पुणे, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी पुणे, खेड सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस उपअधिक्षक खेड व पोलीस निरीक्षक खेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खेड सेझ क्षेत्रामध्ये गेली चार वर्षांत खून, भांडणे, मारामारीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. काल पुन्हा दोन गटांत गंभीर मारामारीचा प्रकार घडला. याबाबत खेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. औद्योगिकीकरणातून विकास होत असताना नोकरी, व्यवसाय उपलब्ध होत आहेत; परंतु ठेकेदारीच्या स्पर्धेतून भांडणे, मारामारी नित्याची झाली आहे. पोलीस चौकी सुरू व्हावी यासाठी आमदार प्रवीण दरेकर, आमदार भाई गिरकर यांनी तारांकित प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित केला होता.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले होते. डिसेंबर 2024मध्ये सेझ क्षेत्रात ठेकेदारीच्या वादातून मारामारीचा प्रकार घडला, तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांना अशोकराव टाव्हरे यांनी निवेदन दिले होते. मुख्यमंत्री यांचे सचिव राजेंद्र खंदारे, अमोल पाटणकर यांनी पोलीस अधीक्षक पुणे यांना फोन करून तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले होते. दि. 10 जानेवारी रोजी पोलीस चौकीचे उद्घाटन खेड सेझ क्षेत्रात झाले; परंतु संबधित चौकी ही बंद असते अशी तक्रार स्थानिक नागरिक नेहमी करीत असतात.
दावडी बीटचे अंमलदार नियमितपणे दिवसातील काही वेळ चौकीत असतात; परंतु बंदोबस्त वा इतर कारणास्तव पोलीस उपलब्ध नसेल तर पाठविता येत नाही.
-प्रभाकर मोरे, पोलीस निरीक्षक खेड





