पुणे जिल्हा : यंदा खरिपाचा पेरा वाढणार!

पुरंदर तालुका कृषी विभागाचा अंदाज : काही भागात पेरण्या सुरू
निखील जगताप
बेलसर – पुरंदर तालुक्यात गत वर्षी समाधानकारक व पेरणी योग्य पाऊस झाला नसल्याने पेरणी अत्यंत कमी क्षेत्रावर करण्यात आली होती; परंतु हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुरंदर तालुक्यात यंदा चांगला व समाधानकारक पाऊस होणार असल्याने तालुक्यात यंदा खरीप पेरणी क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज पुरंदर कृषी विभागाने वर्तविला आहे.
खरीप हंगामामध्ये तालुक्यात भात, बाजरी, वाटाणा, भुईमूग, सोयाबीन, कांदा यांची पेरणी तर टोमॅटो, पालेभाज्या, फळभाज्या व आडसाली ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. दिवे, जेजुरी, सासवड, वीर, वाल्हा, गराडे परिसरात मोठ्या प्रमाणात पेरण्या सुरू झाल्या आहेत तर काही ठिकाणी पेरणी पूर्व मशागती पूणर्र् झाल्या आहेत.
तर अद्याप काही भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने पेरणीस घाई न करण्याचा सल्ला कृषी अभ्यासकांनी दिला आहे.तालुक्यात खरीप हंगाम हा महत्त्वाचा हंगाम मानला जातो. खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात उलाढाली शेतकरी करतात. तर यंदा पेरणी क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज असल्याने कृषी व्यवस्थेवर अवलंबुन असणारे सर्व उद्योग व्यवसाय समाधानाच्या आशेवर आहेत.
80 मिमी पाऊस झाल्या नंतरच पेरणी करा
तालुक्यात 71.9 टक्के म्हणजेच सरासरी 80.7 मिमी पाऊस झाला आहे; परंतु तालुक्यातील सासवड, कुंभारवळण आणि राजेवाडी मंडलमध्येच पेरणी योग्य पाऊस झाला आहे. त्यामुळे 80 मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
चालू वर्षात चांगले पाऊसमान सांगितले असलेने व जुन महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने यंदा खरीप पेरा वाढण्याची शक्यता आहे व त्या अनुषंगाने सर्व आवश्यक तयारी कृषी विभागाने क्षेत्रीयस्तरावर पूर्ण केलेली आहे.
– सुरज जाधव, कृषी अधिकारी, पुरंदर तालुका
पिकनिहाय प्रस्तावित क्षेत्र हेक्टरमध्ये
पीक***सरासरी क्षेत्र***2023पेरणी क्षेत्र***2024 प्रस्तावित क्षेत्र
भात***1208.15***1109.90***1210
बाजरी***12327.20***5601.60***8500
वाटाणा***2700***2584.60***2800
भुईमूग***2049.80****2439.30***2500
सोयाबीन***311.02***1904.65***2100
कांदा***1836***531.90***1850
टोमॅटो***1370***769.70***1400
पालेभाज्या***1710.90***1387.70***2000
फळभाज्या***750***1757.60***1800
आडसाली ऊस***1911.60***1443.90***2600





