Pune District : भोर तालुक्यात खरिपाची लागवड निम्म्यानेच

-पावसाने विश्रांती न घेतल्याचा परिणाम
भाटघर – यावर्षी पावसाने मे महिन्याच्या अंतिम टप्प्यात हजेरी लावल्याने व सद्यस्थितीपर्यंत विश्रांती न घेतल्याने भोर तालुक्यात खरीप हंगामाच्या लागवडीत घट झाली आहे. तसेच रब्बी हंगामातील भुईमूग काढणी अगोदरच पावसाने सुरुवात केल्याने भुईमूग अक्षरशा शेतातच कुजून गेला. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे.
तालुक्यात सध्या खरीप हंगामातील एकूण १७ हजार ६२४ पैकी ९ हजार २२७ हेक्टरवर पेरणी झाली असल्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेने यंदा खरीप हंगाम शेतकऱ्यासाठी धोक्याचा मानला जात आहे. तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासून पडत असलेल्या मान्सून पूर्व पावसामुळे उन्हाळ्यातील बागायती पिके काढणी खाचरात राहिल्याने ते क्षेत्र वगळता शेतकऱ्यांनी उर्वरित मिळालेल्या क्षेत्रात आहे. त्या वाफसावर खरीप हंगामाची तयारी केली होती. मात्र, मान्सून पावसाने लवकरच हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामाचे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले. त्यामुळे भात रोपेची टाकणी करता आली नाही. तर कडधान्य बी-बियाणेची पेरणी करता आली नाही. परंतु डोंगर उताऱ्यावरील भात शेतीमध्ये शेतकऱ्यांनी पेरणी केली. तर काही ठिकाणी भात रोपाचे तरवे टाकले.
ज्या ठिकाणी भात रोपाची लागवड योग्य रोपे तयार झाली, अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी भात लावणीची कामे सुरू केली आहे. मात्र, अल्पभूधारकपेक्षा जास्त शेती असणारा शेतकरी खरीप हंगामात अडचणीत आला आहे. तसेच दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असल्यामुळे तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात पेरणीसह, लावणीची कामे सुरू झाली आहेत. मात्र, पश्चिम पट्ट्यात फक्त भात लावणीची कामे लगबगीने सुरू आहेत.
तालुक्यातील खरीप हंगामात शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कृषी विभाग तसेच कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या माध्यमातून शेतकऱ्यांना बांधावर जाऊन आधुनिक पद्धतीने भात लागवड व इतर प्रमुख पिकांचे उत्पादन तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यात येत असताना शेतकरी बांधवांनी भात रोपवाटीकेमध्ये साठणाऱ्या पावसाच्या अतिरिक्त पाण्याचानिचरा करावा तसेच फळबागेत पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी.
भात पिकाच्या लागवडीसाठी भात खाचरात चिखलणी करून, २१ दिवस पूर्ण झालेल्या रोपांची लागवड करावी. खोडकीडीच्या नियंत्रणासाठी पुर्नरलागवडीपूर्वी रोपांची मुळे क्लोरोपायरीफॉस २०% इ.सी., ०.१% द्रावणात १२ तास बुडवून ठेवावीत व नंतर लागण करावी, नवीन लागण केलेल्या भात खाचरात रोपे स्थिर होइपर्यंत पाण्याची पातळी १ ते २ सें.मी. ठेवावी असे आवाहन भोर तालुका कृषि अधिकारी शरद धर्माधिकारी यांनी केले आहे.
४ हजार १५० हेक्टरवर भात लागवड
तालुक्यात मागील वर्षाच्या तुलनेने यंदा खरीप हंगामात भात पिकाचे सरासरी क्षेत्र ७ हजार ५०० पैकी ४ हजार १५० हेक्टरवर लागवड पूर्ण झालेली आहे. नाचणी पिकाचे सरासरी क्षेत्र १ हजार ३२९ हेक्टरपैकी ९३६ हेक्टवर लागवड पूर्ण लागण झालेली आहे. सोयाबीन पिकाचे सरासरी क्षेत्र ३ हजार ३०० हेक्टर पैकी १ हजार ८ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. भुईमूग पिकाचे सरासरी क्षेत्र २ हजार ४०० हेक्टर पैकी १ हजार १३३ हेक्टरवर पेरणी झालेली आहे.





