पुणे जिल्हा : खानापूरचे “आरोग्य’ समस्यांच्या विळख्यात

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, प्रशासनाचे दुर्लक्ष
खडकवासला – खानापूर (ता. हवेली) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र घाणीच्या विळख्यात सापडले आहे. परिसरात पसरलेल्या दुर्गधीमुळे तेथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याकडे संबंधित ग्रामपंचायत व आरोग्य केंद्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
आरोग्य सुविधा देणाऱ्या केंद्र परिसरातच घाणीचे साम्राज्य असल्याने रूग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आरोग्य केंद्राच्या परिसरात गटारातून जाणारे घाण पाणी वाहत आहे. तिथेच कचऱ्यांचे ढीग पडले आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्याने कचऱ्याची दुर्गधी सुटली आहे.
गटाराचे चेंबर उघडे असून अतिशय घाण गटाराचे पाणी परिसरात पसरले आहे. यांचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने आरोग्य केंद्र परिसरात घाण टाकणाऱ्यांचे मनोबल वाढत आहे. त्यामुळे आरोग्य केंद्र परिसरात घाण टाकणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
खानापूर ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच पार पडला आहे. यापूर्वी ग्रामपंचायत प्रशासनास सांगण्यात आले आहे. त्वरित हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल, असे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांनी सागितले आहे.
– डॉ. स्वागत रिंढे, वैद्यकीय अधिकारी खानापूर





