Pune District: डोंगर उतारावर पिकवली रसाळ स्ट्राॅबेरी

वीसगाव खोरे : हिर्डोशी,धामणदेववाडी (ता.भोर) येथील प्रयोगशील शेतकरी सुरेश कोंडिबा गोरे यांनी नगदी पीक असलेल्या स्ट्राॅबेरीचे पीक घेत आदर्श निर्माण केला आहे. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या सुरेश गोरे यांनी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असताना अचानक गावातच राहून शेती व्यवसाय करण्याचे ठरवले. त्यातच त्याने स्ट्रॉबेरी पीक घेण्याचा निश्चय केला. एक एकर शेतीतून स्ट्राॅबेरीपासून आतापर्यंत पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात स्ट्रॉबेरी शेतीसाठी गावातच नाचणीची शेती करत असलेले १ एकर क्षेत्र निवडले. यासाठी महाबळेश्वर येथील राजेंद्र ढेबे यांच्या श्रेयस स्ट्राॅबेरी फार्ममधून २६ हजार रोपे आणली. यात १७,५०० विंटरडाउन जातीचे रोपं ५ रुपयेप्रमाणे आणि आर वन आणि नाबिला जातीचे रोपं १३ रुपयेप्रमाणे विकत आणली.
नाचणी शेतीची लागवडपूर्व मशागत करून साडेचार फुटाचा डबलबेडवर एक फूट बाय एक फूट अंतरावर मल्चिंग पेपर अंथरुन रोपांची लागवड केली. ठिबकने पाणी दिले. रोपांची योग्य निगा, खतांचा वापर केला. जंगल भागात शेती असल्याने वन्य प्राण्यांपासून शेतीचे मोठे नुकसान होत असल्याने कापडी कुंपण केले.
जीवांमृतामुळे फळाचा गोडवा वाढला
सध्या फळे झाडाला पिकल्याने गोडवा जास्त असून, सरासरी १०० रुपये बाजारभाव मिळत आहे. चांगले उत्पादन मिळण्यासाठी शेणखत, लेंडी खत, जीवांमृताचा वापर केल्यामुळे फळाचा गोडवा वाढला आहे.
कुटुंबीयांचे पाठबळ
स्ट्रॉबेरी शेतीसाठी सुरेश याला आई येसाबाई गोरे, वडील कोंडिबा गोरे व भाऊ मारुती गोरे यांचे योगदान असते. तसेच महाबळेश्वर येथील सुप्रिया व राजेंद्र ढेबे या दांपत्यांचे मार्गदर्शन असते. आई शेतात काम करून भोर महाड मार्गावरील हिर्डोशी वारवंड दरम्यान असणाऱ्या पुलाजवळ स्टॉल लाऊन स्ट्रॉबेरी विक्री करत आहेत. तर सुरेश हा पुणे येथे जाऊन थेट ग्राहकांपर्यंत पोहचून स्ट्रॉबेरी विक्री करत आहे. थेट ग्राहकांपर्यंत गेल्याने समाधानकारक भाव मिळत आहे.
तहसीलदार यांच्याकडून पाहणी
सलग दुसऱ्या वर्षी स्ट्राॅबेरी पीक घेतल्याने भोर तहसीलदार राजेंद्र नजन यांनी धामणदेववाडी येथे शेतीची पहाणी करून स्ट्राॅबेरी पिकाची माहिती घेतली. दुर्गम डोंगरी भागात नगदी पीक घेतल्याने तहसीलदार राजेंद्र नजन यांनी प्रयोगशील शेतकरी सुरेश गोरे यांचे कौतुक केले. या प्रसंगी नायब तहसीलदार आजीनाथ गाजरे, मंडलाधिकारी रुपाली गायकवाड, शैला धामुणसे उपस्थित होते.
कोट : स्ट्रॉबेरीच्या १ एकर शेतीतून आतापर्यंत पाच लाख रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. चांगला बाजारभाव मिळाल्यास किमान तीन लाखांपर्यंत उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. ग्रामीण भागातील युवकांनी कामधंद्यासाठी शहरांकडे स्थलांतर करण्यापेक्षा शेतीत वेगवेगळे प्रयोग करून गावातच रोजगार उपलब्ध करून यशस्वी व्हावे.
– सुरेश गोरे, शेतकरी, हिर्डोशी धामणदेववाडी





