पुणे जिल्हा : बारामती शहरात भाजप पदाधिकाऱ्यांचा जल्लोष

अजित पवारांच्या विजयासाठी पदाधिकारी सक्रिय
बारामती – उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महायुतीच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी बारामती शहरातील भिगवण चौकात जल्लोष केला. महाराष्ट्रात भाजपाने ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर बारामतीतील भाजप कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.
संपूर्र राज्याचे लक्ष लागून राहिलेले बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विजयासाठी भाजप कार्यकर्त्यांनी देखील मनापासून काम केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार बारामतीत भाजप कार्यकर्ते सक्रिय झाले होते. अजित पवार यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांचे कामदेखील अधोरेखित झाले आहे.
भाजप कार्यकर्त्यांची कामाची व मतदारांपर्यंत पोहोचण्यास अनोखी शैली होती. त्यामुळे बारामती मतदारसंघातील भाजप मतदारांपर्यंत पोहोचून महायुतीचे उमेदवार अजित पवार यांना मतदान करून घेण्यात भाजप कार्यकर्ते यशस्वी झाले. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरी देखील भाजपची देखील व्होट बँक बारामती शहर आणि तालुक्यात आहे. त्या सर्वांनी अजित पवार यांना मतदान केल्याचे त्यांच्या मताधिक्यावरून दिसून येत आहे.
राज्यातील भाजपने केलेल्या लक्षणीय कामगिरीमुळे कार्यकर्ते खुश झाले आहेत. महायुतीची सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, अशा प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. शहरातील भिगवण चौकात गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, बाळासाहेब गावडे, अविनाश मोठे, दिलीप खैरे, सतीश फाळके, ॲड. नितीन भामे, गोविंद देवकाते यांच्यासह कार्यकर्त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात दमदार कामगिरी केली आहे.





