Pune District : जेजुरीकरांचा मल्हार सर्टिफिकेशनला विरोध

जेजुरी : शासनाने मांस मटण विक्री संदर्भात मल्हार सर्टिफिकेशन योजनेतील मल्हार हे नाव बदलावे हिंदू संस्कृतीमधील देव दैवतांची नावे मांस-मटण, मद्य विक्री योजनेसाठी वापरू नयेत. या योजनेला विरोध नसून अन्य नावाने योजना सुरू करावी, अशी विनंती व आवाहन करण्यात येत असून याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री नितेश राणे, आमदार विजय शिवतारे यांना निवेदन देण्यात येणार आहे. मागणी मान्य न झाल्यास पुढील काळात जेजुरीकर ग्रामस्थ आंदोलनात्मक पवित्रा घेणार असल्याचा इशारा समस्त खांदेकरी मानकरी, सेवेकरी, माजी विश्वस्तांच्या वतीने देण्यात आला.
नितेश राणे यांनी मटण मांस विक्रीसंदर्भात मल्हार सर्टिफिकेशन योजना सुरू करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी माध्यमांवर प्रसारित होताच जेजुरीकर ग्रामस्थांसह राज्यातील खंडोबा भक्तांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या अनुषंगाने बुधवारी (दि. 12) समस्त जेजुरीकर खांदेकरी मानकरी, सेवेकरी मंडळ व माजी विश्वस्तांची बैठक जानाई मंदिर येथे पार पडली. यावेळी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, तुषार कुंभारकर, निलेश हरपळे, सचिव छबन कुदळे, मनोज शिंदे, संतोष खोमणे पाटील, पुजारी गणेश आगलावे, माजी प्रमुख विश्वस्त सुधीर गोडसे, संदीप जगताप, शिवराज झगडे आदी उपस्थित होते.
देवसंस्थान विश्वस्त मंडळाकडून नावाचे स्वागत
श्री मार्तंड देवसंस्थान समितीच्या विश्वस्त मंडळाने पत्रक काढले असून हिंदू समाजाद्वारे मांस-मटण विक्री संदर्भात मल्हार सर्टिफिकेशन या योजनेला व नावाला कोणताही विरोध वा आक्षेप नाही. सरकारने घेतलेल्या निर्णयाचे समर्थन केले आहे. विशेष म्हणजे विश्वस्त सदस्यांची बैठक घेत साधक बाधक चर्चा होऊन बहुमताने या नावाचे समर्थन व स्वागत केले असल्याचे म्हटले असून देवसंस्थानला या नावाला किंवा योजनेला विरोध असण्याचे कोणतेही कारण नाही असे म्हटले आहे. या पत्रकावर प्रमुख विश्वस्त अभिजीत देवकाते, विश्वस्त मंगेश घोणे, पोपट खोमणे, विश्वास पानसे, अनिल सौंदडे आदींच्या स्वाक्षर्या आहेत. मात्र, विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी मल्हार या नावाला विरोध दर्शविला असून तसे पत्र नितेश राणे यांना पाठवले आहे.
देवसंस्थान विश्वस्त मंडळाने या नावाचे स्वागत करणे हे चुकीचे असून विश्वस्तांची नियुक्ती विधी व न्याय विभागाअंतर्गत धर्मादाय आयुक्त (न्यायाधीश) करतात त्यामुळे त्यांनी या न्यासाचा वापर राजकारणासाठी न करता भाविकांच्या सोयी सुविधा निर्माण करणे, जत्रा यात्रा उत्सव धार्मिक विधी यांचे आयोजन नियोजन करणे, भविकभक्तांच्या हिताचे सामाजिक उपक्रम राबवावेत धार्मिक संस्थेचा वापर राजकीय निर्णयासाठी करू नये, असे मत ग्रामस्थांच्या वतीने मांडण्यात आले.





