Pune District : माळेगाव कारखान्यावर जागर गोंधळ आंदोलन

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या वतीने बारामती तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर जागर गोंधळ आंदोलन करण्यात आले.
गेल्या काही वर्षांपासून उसाच्या उत्पादन खर्चात वाढ होऊनही, उसाच्या दरात अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा घणाघात यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला.
उसाला योग्य आणि किफायतशीर दर मिळावा, किमान आधारभूत किंमत (FRP) एकररकमी मिळावी या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी माळेगाव कारखान्याने बांधलेले आणि एसटीपी आणि ईटीपी प्लांट केवळ शेतकऱ्यांचे पैसे खाण्यासाठीच बांधले असल्याचा आरोप सभासदांकडून करण्यात आला.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बारामती तालुकाध्यक्ष ॲड एस. एन.जगताप, सतीश खोमणे, गणपत देवकाते, शहराध्यक्ष संदीप गुजर, शहर युवक अध्यक्ष सत्यव्रत काळे, इंद्रसेन आटोळे, गौरव जाधव आदींसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.





