माउलींचा 750 वा जन्मोत्सव, तुकोबांचा 375वा वैकुंठगमन सोहळ्याचे औचित्य आळंदी – संत ज्ञानेश्वर महाराजांचा 750 वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराजांचा 375 वा वैकुंठगमन सोहळ्याचे औचित्य साधून तुकाराम महाराजांची पालखी परतीच्या प्रवासात आळंदीत आणावी यासाठी आळंदी देवस्थानाकडून देहू देवस्थानला पत्राद्वारे निमंत्रण देण्यात आले आहे. आळंदी देवस्थान आणि ग्रामस्थांकडून जोरदार स्वागत केले जाणार असल्याचा पत्रात उल्लेख आहे. दरम्यान 28 जुलै 2008 मध्ये तुकाराम महाराजांच्या 400 व्या जन्मोत्सवावेळी तुकोबांचा पालखी सोहळा आळंदीमध्ये आला होता. माउलींचा पालखी सोहळा आळंदीत रविवारी (दि. 20) येणार आहे. त्याच दिवशी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आळंदीत यावा असे निमंत्रण देवस्थानाकडून दिले आहे. याबाबतचे पत्र आळंदी देवस्थानचे सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे आणि विश्वस्त चैतन्य महाराज कबीर यांनी आळंदी देवस्थानच्यावतीने देहू देवस्थानचे अध्यक्ष जालिंधर महाराज मोरे यांना दिले आहे. परंपरेप्रमाणे संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीस जाणे महत्त्वाचे मानले जाईल. संत तुकाराम महाराज आळंदीत माउलींचे दर्शन घेतल्यानंतर पंढरपूरला मार्गस्थ होत. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र तोपनिधी नारायण महाराज यांनी पालखी सोहळा सुरू केला. 1685 पासून देहूमधून संत तुकारामांच्या पादुका पालखीत ठेवून ते आळंदीत येत. नंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घेत पुढे पंढरपुरला प्रस्थान करत. त्यानंतर ही परंपरा खंडित झाल्यावर गुरु हैबतबाबा आरफळकर यांनी 1832 मध्ये स्वतंत्रपणे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सुरू केला आणि दोन्ही संतांच्या पालखीचे मार्ग बदलले. दोन्ही पालखी सोहळ्यात लाखोच्या संख्येने भाविक सहभागी होत आहेत. या दोन संतांची भेट होण्यासाठी या वर्षी सोहळा आळंदीला नेण्याची मागणी वारकर्यांच्यावतीने आळंदी देवस्थानने देहू देवस्थानला केली आहे. दोन्ही देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार असून आळंदीमध्ये स्वागतासाठी तयारीबाबत देवस्थान तयारी करत आहेत. पालख्यांच्या भेटीचा अनुपम सोहळा यापूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन पालख्यांच्या भेटीचा अनुपम सोहळा 28 जुलै 2008 रोजी झाला होती. दोन्ही देवस्थानांच्या एकविचाराने संत तुकाराम महाराजांचा सोहळा आळंदीमध्ये आला होता. यावेळी आळंदीकर ग्रामस्थ आणि देवस्थानाकडून जोरदार स्वागत केले होते. त्यावेळी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या जन्म चतुःशताब्दी वर्षाचे औचित्य होते. दोन दिवसांत पाहणी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानकडून दिलेल्या पत्रानंतर देहू संस्थान पदाधिकाऱ्यांकडून येत्या दोन दिवसांत आळंदीत येऊन पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर 20 जुलै रोजी ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज दोन्ही पालखी सोहळे आळंदीत येतील. 20 जुलैचा मुक्काम आळंदीत करून तुकोबाराय यांचा पालखी सोहळा देहूकडे प्रस्थान ठेवेल, असे प्राथमिक नियोजन असल्याचे आता तरी समजते आहे.