पुणे जिल्हा : कृषी संकल्प अभियानाअंतर्गत १५ हजार शेतकऱ्यांशी संवाद

बारामतीच्या राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस प्रबंधन संस्थेचा उपक्रम
बारामती – राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस प्रबंधन संस्था, बारामतीच्या १४ पथकांनी विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत गेल्या तीन दिवसांत सातारा, सांगली, पुणे, अहिल्यानगर आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांमधील शेकडो गावांमध्ये थेट शेतीत जाऊन १५ हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांशी संवाद साधला.
या उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणे, हवामान-समर्थ शेती तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक, आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा शेतीतील उपयोग, तसेच केंद्र व राज्य सरकारांच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना यांची माहिती देणे हा आहे. या अभियानात संकल्प रथ गावोगावी फिरत असून, शेतकऱ्यांपर्यंत थेट माहिती आणि तंत्रज्ञान पोहोचवण्याचे कार्य करत आहे.
शास्त्रज्ञ गावांतील शेती आणि इनोव्हेटिव्ह तंत्रज्ञानाची पाहणी करून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत आहेत. शेतकऱ्यांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ‘लॅब टू लँड’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी हे अभियान प्रभावी ठरत आहे.
२९ मे ते १२ जून २०२५ दरम्यान १५ दिवस चालणाऱ्या या भव्य अभियानामध्ये महाराष्ट्रातील सुमारे १२ लाख हेक्टर क्षेत्र व्यापले जाणार आहे. विविध भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली संस्थांचे वैज्ञानिक आणि संबंधित जिल्ह्यांतील कृषी विज्ञान केंद्रे यामध्ये सक्रीय सहभागी आहेत.





