Pune District : वरकुटे उड्डाणपुलावर संरक्षक कठडे बसविण्यास सुरुवात

लोणी देवकर : पुणे-सोलापूर रस्त्यावर इंदापूर तालुक्यातील उड्डाणपुलाची सुरक्षा रामभरोसे असल्याबाबतचे वृत्त दैनिक प्रभातने (दि. 8 फेब्रुवारी) प्रसिद्ध केले होते. त्याची दखल संबंधित प्रशासनाने घेत उड्डाणपुलाला संरक्षक कठडे बसविण्यास सुरुवात केली आहे.
पुणे-सोलापूर रस्त्यावरील इंदापूर तालुक्यातील वरकुटे पाटी येथे वर्षभरापासून नागरिकांच्या सोयीसाठी उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. या ठिकणी सतत अपघात घडत असल्याने प्रशासनाने या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम केले; मात्र सदर उड्डाणपूल आणि सेवा रस्ता तातडीने आणि चांगल्या दर्जाचा असणे अपेक्षित होते.
या ठिकाणचे काम निकृष्ट दर्जाचे तसेच सुरक्षा योजना राम भरोसे असल्याचे पहावयास मिळत होते. या राष्ट्रीय महामार्गावरून अनेक लहानमोठी, जड-अवजड वाहने ये-जा करत असतात. तसेच स्थानिकांच्या सोयीसाठी सेवा रस्त्याची सोय करण्यात येत आहे; मात्र गेल्या वर्षभरापासून या ठिकाणचे काम संथ गतीने सुरू असून वाहनचालकांना तसेच स्थानिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. प्रशासनाने उड्डाण पुलाच्या सुरक्षेविषयी कामास सुरवात केल्याने नागरिकांसह वाहन चालकांनी दैनिक प्रभात चे आभार मानले.
उड्डाणपुलाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे तसेच उड्डाण पुलाचे काम अर्धवट आणि निकृष्ट दर्जाचे असताना देखील त्यावरून वाहतूक सुरू करण्यात आली होती. त्या ठिकाणी पुलाला कसल्याही सुरक्षा नसल्याने त्यावरून अनेक वाहन खाली पडली आहेत. त्यामुळे परिवहन विभागाने तात्काळ लक्ष घालून कामाबाबत दर्जा आणि सुरक्षा सुधारण्यासाठी लक्ष घालण्याची मागणी वाहनचालकांन मधून होत होती.





