Pune District : आश्रमशाळा, वसतिगृहांमध्ये सीसीटीव्ही बसवा

वळसे पाटील ः कातकरी मुलांसाठी आश्रम शाळेत राखीव कोटा ठेवावा
मंचर – आदिवासी प्रकल्पांतर्गत चालू असलेल्या आश्रम शाळा आणि वसतिगृहांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसवले जावेत. कातकरी मुले शिक्षणाकडे वळावीत यासाठी आश्रम शाळेत त्यांना राखीव कोटा ठेवला जावा, विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ चांगले रहावे. यासाठी आश्रम शाळेत समुपदेषक नेमला जावा, इत्यादी सूचना माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या.
घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे आदिवासी विकास विभागाची आढावा बैठक माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई, समाजकल्याणचे माजी सभापती सुभाषराव मोरमारे, संजय गवारी, प्रकाश घोलप, प्रवीण पारधी, अमोल अंकुश, बुधाजी डामसे, निलेश साबळे, अशोक गभाले, इंदुबाई लोहकरे, जनाबाई उगले, निलेश बो-हाडे, प्रदीप अमोंडकर, संतोष सैद, सोमनाथ काळे तसेच सहायक प्रकल्प अधिकारी सोनुल कोतवाल, संदेश पाटील, प्रियंका घनवट इत्यादी उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आदिवासी विकास विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. धरती आबा जन भागिदारी योजना, शबरी आदिवासी घरकुल योजना, नागापूर येथील पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करणे, आहुपे येथे ज्युनिअर कॉलेज सुरू करणे, पोखरी येथे नव्याने वसतीगृह बांधण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, आश्रम शाळा व वसतीगृहातील रिक्त कर्मचारी पदे, मध्यवर्ती भोजनगृहातून दर्जेदार जेवण पुरवले जावे, सर्व आश्रम शाळा व वसतीगृहांमध्ये गरम पाण्याची व्यवस्था असावी, स्टॉबेरीबरोबर फुलशेतीला प्राधान्य मिळावे, आदिवासी मुलांसाठी मोठे क्रीडा संकुल व्हावे, अशा विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली.
आश्रम शाळेतील विद्यार्थी पुढच्या शिक्षणात टिकावीत. त्याचा प्राथमिक शिक्षणाचा दर्जेदार शैक्षणिक विकास व्हावा. यासाठी योजना तयार करा, यामध्ये शिक्षक व पालकांनाही सहभागी करून घ्या. इत्यादी सूचना वळसे पाटील यांनी केल्या. आदिवासी प्रकल्पांतर्गत चालू असलेल्या विविध विकास कामासंदर्भात प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी माहिती दिली.
शिक्षकांनी प्रयत्न करावेत
आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ चांगले रहावे. यासाठी आश्रम शाळेत समुपदेशक नेमला जावा, तसेच मुलांना समजतील अशा भाषेत व्याख्याने ठेवली जावीत, आदिवासी समाजातील व्याख्याते बोलवावेत. वसतिगृह व आश्रम शाळेतील शिस्त बिघडता कामा नये. यासाठी अधिक्षक व मुख्याध्यापक यांनी कडक धोरण ठेवले पाहिजे. आश्रम शाळेतील दहावी व बारावीचे निकाल चांगले लागले, ही कौतुकास्पद बाब आहे; मात्र गणित, विज्ञान या विषयात विद्यार्थ्यांना चांगले गुण दिसत नाहीत. या विषयांचे गुण वाढविण्यासाठी आणि शैक्षणिक दर्जा उत्तम होण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत.





