31 शाळांना योग प्रशिक्षक पुरवले इंदापूर – शहरातील वृक्षप्रेमी असलेल्या, शहा परिवाराने पतंजली योग समिती इंदापूर व महिला पतंजली योग समितीच्या साधकांना, रोज योग करण्यासाठी, मोफत कार्यालय उपलब्ध करून दिल्याने, आपला योग वर्ग महाराष्ट्रमध्ये एक नंबरच्या स्थानावर पोहोचलेला आहे. साधकांची संख्या वाढत चाललेली आहे. यामधून आम्ही योगशिक्षक घडविण्याचे काम करत आहोत, अशी माहिती योग परिवाराचे प्रमुख दत्तात्रय अनपट यांनी दिली. पतंजली योग समिती इंदापूर व महिला पतंजली योग समिती इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 11वा आंतरराष्ट्रीय योगदिन शहा कार्यालय येथे बहुसंख्येने पुरुष व महिला साधकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त इंदापूर तालुक्यातून 31 शाळांची योग दिन साजरा करण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून देणेबाबत विनंती केली होती. त्यानुसार आज संबंधित शाळेत परिवारातील एकूण 51 योग शिक्षक शिक्षिका यांनी बाहेरगावी जाऊन, त्या शाळेमध्ये योग दिन उत्साहात साजरा केला. त्याचबरोबर या सर्व शाळांना आम्ही पाठवलेल्या शिक्षक, शिक्षिका यांचा हार, पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन सन्मान न करता पर्यावरणाचं संवर्धन व्हावे या सामाजिक बांधिलकीतून, त्याच शाळेच्या परिसरात एक वृक्षाची लागवड उपस्थित शिक्षक यांच्या शुभहस्ते करावी. अशी विनंती केलेली त्या संकल्पनेस सर्व शाळांनी उत्स्फूर्तपणे वृक्ष लागवड करून दाद दिली. इंदापूर येथील चंदुकाका सराफ प्रा. लि. यांच्या वतीने सर्व 51 योगशिक्षकांचा वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला. परमपूज्य योगऋषी श्रद्धेय स्वामी रामदेव जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 21 वर्षापासून इंदापूर शहरामध्ये मोफत योग वर्ग घेतला जातो. सर्व धर्मीय पुरुष व महिला भगिनी ह्या उपस्थित असतात. यावेळी परिवाराचे उपाध्यक्ष शहाजी बोराटे यांनी दत्तात्रय अनपट यांना योगरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल, ठराव मांडला, त्यास सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये मान्यता दिली, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिवाराचे सचिव सुधीर मखरे यांनी केले. त्याचबरोबर सूत्रसंचालन सौ सुनीता गलांडे यांनी केले. तर लक्ष्मण रेडके यांनी आभार मानले.