Pune District : दूध धंद्यात इंदापूरचा राज्यात लौकीक

इंदापूर : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ तरुण असतानाही नवीन तंत्रज्ञान शेतीतील अद्यावत पॅटर्न तालुक्यातील गावागावापर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी महोत्सवाच्या माध्यमातून यशस्वी प्रयत्न करत आहे. मी अनेकदा इंदापूरला आलो आहे. दूध धंद्याच्या बाबतीत मोठी प्रगती आहे, महाराष्ट्रामध्ये इतकी प्रगती करणारा दुसरा तालुका नाही. असे गौरवोद्गार राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काढले.
कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर आयोजित पाच दिवसीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते व राज्याचे क्रीडा व अल्पसंख्यांक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी अखिल भारतीय द्राक्ष बागायदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, पुणे जिल्हा बँकेचे संचालक व बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, माजी आमदार यशवंतराव माने, सभापती तुषार जाधव, कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन भरत शहा, नीरा भीमा साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन कांतीलाल झगडे, माजी सभापती विलासराव माने, उपसभापती मनोहर ढुके, मधुकर भरणे, दत्तात्रय फरतडे, रोहित मोहोळकर, संग्रामसिंह निंबाळकर, आबा देवकाते, दशरथ पाटील पोळ, मंगलाताई झगडे, रूपालीताई वाबळे, रोनक बोरा, बाजार समितीचे सचिव संतोष देवकर यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषिमंत्री कोकाटे म्हणाले, मागील काही दिवसांपासून मेहनत घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावले आहेत. शेतकरी बांधवांची वेगवेगळी जनावरे या कृषी महोत्सवात अतिशय चांगली आहेत. चांगली खिलार जातीची जनावरे बघण्याचा योग यानिमित्ताने आला आहे. लहान शेतकर्यांना पुढे आणण्यासाठी राज्य तसेच केंद्र सरकार वेगवेगळ्या प्रकारची यंत्रणा, योजना राबवत आहे. चांगलं काम करणार्या शेतकर्यांना व शेतकर्यांसाठी काम करणार्या चांगल्या कंपन्यांना पाठबळ देण्याचे काम, राज्य सरकार करेल. भविष्यकाळात शेतकरी सुखी कसा होईल यासाठी प्रयत्न करणार असून, शेती छंद व आवड म्हणून शेतकर्यांनी करावी, नवीन पद्धतीने प्रयोग शेतकर्यांनी करावेत. परकीय चलन आपल्याला शेतीच्या शेतमालातून मिळते आहे. म्हणूनच देशाची प्रगती मोठ्या पद्धतीने होत आहे. राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे अतिशय दिलदार माणूस आहे. राज्याला प्रगतीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार घेऊन निघाले आहेत. त्यामुळे येणारा काळ शेतकरी बांधवांसाठी चांगला असेल.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील शेतकरी कष्टाळू आहे. येथील शेतकरी वेगवेगळे प्रयोग शेतात राबवतो आहे. त्यामुळे येथील शेतकर्यांचा सुखी संसार आहे. अशी माहिती जगदाळे यांनी दिली.
शेतकर्यांचा सन्मान
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शेतकर्यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये केळी बागेतून अधिक उत्पन्न घेणारे प्रगतशील बागायदार किशोर मोहिते, ऊस उत्पादक आदर्श शेतकरी शरद कदम, निर्यातक्षम डाळिंब उत्पादक काकासो पडळकर, पेरू उत्पादक आदर्श शेतकरी उत्तम शेंडे, द्राक्ष उत्पादक शिवाजी करे, ड्रॅगन फूड उत्पादक शेतकरी मारुती व्यवहारे, दुग्धविकास क्षेत्रात मोतीलाल सुरडे, तांत्रिक ड्रोन फवारणी पायलट सोनाली कदम, नियमित शेतमाल खरेदी विक्री नगरे, मासे मासळी योगेश शितोळे, प्रवीण ओंबळे, बाळूराम चौधरी, संदीप शिंदे, उदयशेठ शहा यांचा सन्मान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते पार पाडला.
इंदापूरचा शेतकरी प्रयोगशील -भरणे
क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकर्यांनी शेतीमध्ये अनेक पद्धतीचे बदल केले आहेत, पुढील काळात देखील अद्यावत पद्धतीने शेतकर्यांनी शेती करणे गरजेचे आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न घेणारा शेतकरी इंदापूरचा आहे. नाशिक मध्ये उत्पादनातून क्रांती शेतकरी घडवतोय. त्या पाठोपाठ शेतीमध्ये नवीन प्रयोग राज्यात फक्त इंदापूर तालुका नाशि क आहे. द्राक्ष केळी पोपई, पेरू, ऊस उत्पादक शेतकरी कष्ट करून मेहनत करून यशस्वी पिकवतो आहे. याचा मला अभिमान वाटतो
इंदापूर ः पाच दिवसीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन मंत्री माणिकराव कोकाटे, दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाले.





