Pune District : कलिंगडातून दोन महिन्यांत पाच लाखांचे उत्पन्न

पळसदेव : येथील काळेवाडीमधील प्रगतशील शेतकरी रामदास दगडू चव्हाण यांनी दोन एकर कलिंगडातून अवघ्या 60 दिवसांत पाच लाखाचे उत्पन्न मिळवले. दोन लाख रुपये उत्पन्न खर्च वजा जात दोन महिन्यांत तीन लाखांचा नफा झाला आहे. त्यामुळे शेतकर्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देऊन फळबाग लागवड करून केवळ दोन महिन्यांत तीन लाखांचा निव्वळ नफा मिळवला आहे. अशाच प्रकारे नियोजनबद्ध शेती केल्यास शेतकर्याची आर्थिक स्थिती सुधारण्यास वेळ लागणार नाही.
दोन एकर शेतात ऊस गाळपाला गेल्यावर पुन्हा उसाकडे वळण्यापेक्षा प्रथमच शेतात कलिंगड लागवड केली. शेतात नांगरट, कल्टी व बेड सोडण्यासाठी याला 17 हजार खर्च केला व शेतात 6 फूट बाय दीड फुटावर सिम्बा जातीच्या सुमारे 16 हजार कलिंगड रोपाची लागवड केली. रोपासाठी 1 रुपया 60 पैसे रुपये दराने 25 हजार रुपये रोपाचा खर्च आला. संपूर्ण पिकाला ड्रीपद्वारे पाणी दिले. ड्रीपसाठी 37 हजार खर्च करून चांगल्या प्रकारे पाणी व्यवस्थापन केले.
रोप लागवडीपासून दोन महिने खत व औषध याचा खर्च असा मिळून 2 लाख रुपये उत्पन्न खर्च आला. औषधामध्ये तीन वेळा ड्रीनिचिंग केलं. त्यात ड्रायकोडर्मा, वॉटर सोलेबल खताचा योग्य वापर केला. वाढीच्या अवस्थेत ऑक्साईड व जीवाणू खते वापरली व रोग नियंत्रणासाठी बुरशीनाशक वापरले. त्यामुळे पिकाला रोगाचा अधिकचा धोका बसला नाही.
55 टन उत्पन्न, दहा रुपये किलोने विक्री
दोन एकरांत सुमारे 55 टन उत्पन्न निघाले व याचा दर सध्या 10 रुपये दराने कलिंगडची थेट शेतीतूनच व्यापार्याला विक्री केली. यामध्ये एकूण साडेपाच लाख रुपयाचं उत्पन्न झाले. उत्पादन खर्च वजा जात सुमारे 3 लाख रुपयांचा फायदा झाला. तोही दोन महिन्यांत त्यामुळे चव्हाण यांनी समाधान व्यक्त केलं. एवढी वर्षे ऊसाचा नादी लागलो. मात्र उसापेक्षा फळबागातून शेतकर्याची झपाट्याने प्रगती होऊन शकते, असा विश्वास या वेळी चव्हाण यांनी व्यक्त केला.
उत्पन्न घेण्यासाठी पळसनाथ कृषी केंद्राचे राहुल बनसुडे, सोहेल सय्यद यांनी बांधावर जाऊन वेळोवेळी खत, औषधे व रोग व्यवस्थापन या बाबत मार्गदर्शन केले. त्यामुळे मला समाधानकारक उत्पन्न घेता आले. इतर शेतकर्यांनी उसाच्या अधिक नादी न लागत फळबागा चे उत्पन्न घेतल्यास नक्कीच याचा फायदा होईल. फळबागांना खर्च होतो; मात्र उत्पन्न अधिक मिळत व अगदी कमी काळात मिळतं त्यामुळे उजनी काठावरील शेतकर्यांनी ऊस सोडून फळबागांकडे वळावं त्यात नक्कीच त्यांचा फायदा होईल. आता या पिकानंतर पुन्हा लगेच याच बेडवर पुन्हा कलिंगडाचीच लागवड करणार आहे. या वेळी बेड व ड्रिपचा देखील खर्च कमी होणार आहे.
-रामदास चव्हाण, प्रगतशील शेतकरी काळेवाडी





